Published On : Tue, Mar 3rd, 2020

नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रकल्प पुरस्कृत

केन्द्रीय राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले अवार्ड

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड चे “नागपूर सेफ अँड स्मार्ट सिटी” उपक्रमाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागपूर शहरात ३६०० सीसीटिव्ही ६७१ चौकात उभारण्यात आले आहे. याच्या माध्यमातून नागपूर पोलिसांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात मदत होत आहे.

नुकतेच दिल्ली येथे झालेल्या स्मार्ट सिटी एम्पावरिंग इंडिया कार्यक्रमात केन्द्रीय गृह निर्माण राज्य मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते नागपूर स्मार्ट सिटी ची चीफ नालेज आफीसर श्रीमती शुभांगी गाढवे यांना “नागपूर सेफ ॲड स्मार्ट सिटी” प्रकल्पासाठी बेस्ट स्मार्ट सेफ सिटी प्रकल्प सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

महापौर श्री. संदीप जोशी आणि मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी टीमचे अवार्डसाठी अभिनंदन केले आहे.

नागपूर सेफ ॲड स्मार्ट सिटी प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांची संकल्पना आहे. त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात नागपूरची स्मार्ट सिटी मध्ये निवड होण्यापूर्वीच केली होती. नागपूर स्मार्ट सिटी च्या वतीने या अवार्ड साठी नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी निर्णायकांसमोर डिसेंबर २०१९ मध्ये प्रकल्पाची माहिती सादर केली होती. या अवार्डसाठी देशभर कार्यरत स्मार्ट सिटी च्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर मनपाच्या सिव्हील लाईन्स येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत कार्यरत आहे. नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने १,३६,००० पथदिव्यांना एल.ई.डी.लाईटस मध्ये परिवर्तित केले गेले आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमाने २२७ बस मध्ये जीपीएस सिस्टम लावण्यात आली आहे.

अवार्ड कार्यक्रम अराकस मिडीया प्राइवेट लिमिटेड व्दारे आयोजित करण्यात आला होता.