Published On : Wed, Mar 28th, 2018

‘भारत – बांगलादेश संबंध सर्वोच्च पातळीवर’

बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात महाराष्ट्राने महत्वाची भूमिका निभावल्याचे नमूद करून बांगलादेशाचे भारतातील उच्चायुक्त सय्यद मुअझ्झम अली यांनी आज महाराष्ट्राप्रती आपल्या देशाची कृतज्ञता व्यक्त केली.

बांगलादेश व भारत यांच्यातील संबंध आज सर्वोच्च पातळीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या धोरणाचा हा परिपाक असल्याचे त्यांनी नमूद केले.

उच्चायुक्त मुअझ्झम अली यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

चित्तगाव बंदर भारतातील उत्तर – पूर्व राज्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे नमूद करून भारताने जहाज बांधणी आणि औषधी निर्माण या क्षेत्रांमधे बांगलादेशात मोठी गुंतवणूक करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारताची बांगलादेशातील गुंतवणूक सातत्याने वाढत असून रिलायन्स, अदाणी यांसह अनेक उद्योगांनी उर्जा, पायाभूत सुविधा व इतर क्षेत्रामध्ये एकूण ९ ते १० अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये बांगलादेशाने आर्थिक तसेच सामाजिक क्षेत्रांत लक्षणीय प्रगती करून विकसनशील देश म्हणून मान्यता मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले.

बांगलादेशच्या वस्त्रोद्योग क्षेत्रात ८८ टक्के महिला काम करीत असून वस्त्रोद्योगासह अल्प-पतपुरवठा यामुळे महिलांच्या सक्षमीकरणात मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बांगलादेशात १० लाख रोहिंगे निर्वासित लोक राहत असून त्यांना म्यानमारला परत पाठविण्यासाठी भारताने सहकार्य करावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.