Published On : Wed, Mar 28th, 2018

गोव्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय शुल्काची प्रतिपूर्तीची अंमलबजावणी आजपासून – दीपक केसरकर

Advertisement

मुंबई: सिंधुदुर्गमधून गोवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय शुल्काची परिपूर्तीची रक्कम राज्य शासन देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार असून गोवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणाऱ्या सिंधुदुर्गमधील रुग्णांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती वित्त व नियोजन, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच सिंधुदुर्गमधील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गमधील अनेक रुग्ण हे विविध उपचारासाठी गोवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जात असतात. या रुग्णांकडून आता वैद्यकीय उपचाराचे शुल्क वसूल करण्यास महाविद्यालयाने सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गवासीयांना उपचारासाठी शुल्क आकारण्यात येऊ नये, यासाठी गोवा व महाराष्ट्र राज्यांमध्ये करार होणे आवश्यक असून लवकरच असा करार करण्यात येणार आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणाऱ्या सिंधुदुर्गमधील रुग्णांवरील खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे. गोवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना सिंधुदुर्गमधील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपजिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शिफारस पत्र घ्यावे लागणार आहे. तसेच आपल्या वैद्यकीय उपचारावर झालेले शुल्कासंदर्भातील पावती जिल्हा शल्य चिकित्सकांकडे द्यावे लागेल. त्यानंतर या शुल्काची रक्कम त्या रुग्णाच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत. परंतु अपघातग्रस्त, माकडतापाचे रुग्ण आदी रुग्णांना थेट रुग्णालयात दाखल होता येईल, अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली.

सिंधुदुर्गमधील वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. ओरोस येथील महिला रुग्णालय, ट्रॉमा केअर युनिट, वेंगुर्ला, कणकवली व सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती तसेच नव्या बांधकामांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. तसेच देवगड व वेंगुर्ला येथे नवीन रुग्णालय व शिरोडा येथील रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात येणार आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठीही 60 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्यातील 20 कोटी रुपये येत्या जुलैमध्ये वितरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने केलेल्या भरीव तरतुदीमुळे सिंधुदुर्गमधील आरोग्य यंत्रणा अद्यावत होणार असून वैद्यकीय सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असेही वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.