Published On : Sat, Nov 17th, 2018

संवाद वाढवू, उत्पन्नही वाढेल आयुक्त अभिजीत बांगर यांना विश्वास

Advertisement

नागपूर: ‘लोकांची सेवा’ हा समान मुद्दा असेल तर वितुष्ट येत नाही. कामात सकारात्मकता, प्रामाणिक प्रयत्न असतील तर वादही होणार नाहीत. समान मतप्रवाह व एकत्र होऊन काम करण्याचा मानस आहे. यासाठी संवाद वाढवू, उत्पन्न्ही वाढेल. जीएसटी अनुदानाने बरेचसे ओझे हलके होईल. परंतु, इतर परतफेड असेल. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधून काढू, असे प्रतिपादन मनपाचे नवे आयुक्त अभिजीत बांगर यांनी पत्रकारांशी प्रथमच संवाद साधतांना व्यक्त केला.

आयुक्त बांगर म्हणाले, पालघर व अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून कामाचे समाधान मिळाले. मनपातील ही पहिलीच संधी आहे. नागपूर ही नावाजलेली मनपा आहे. त्यामुळे आव्हानांचे मुद्दे आहेत. सर्वांच्या सहकार्याने मार्ग काढू. लोकांची सेवा हाच उद्देश आणि समान मतप्रवाह असल्यास कामात अडचण होणार नाही. माध्यमांचा आपल्याला सकारात्मक अनुभव आला. प्रशासनाचा फिडबॅक एकांगी असतो. तेव्हा, वस्तुनिष्ठ पत्रकारितेतून चांगले फिडबॅक मिळते. काही ठिकाणी सुधार करता येईल. रूजू झाल्यानंतर रोज २ ते ३ बैठका घेत आहे. स्मार्ट सिटी, रस्ते, नगरोत्थान, पाणीपुरवठा आणि स्वच्छ भारत अभियान यावर बैठक झाली.

आर्थिक परिस्थीतीही माहिती आहे. उत्पन्नाचे साधन वाढविण्याचे प्रयत्न राहील. जीएसटी अनुदान वाढल्याने मनपाचा बांधील खर्चाची अडचण दूर होईल. परंतु, इतर परतफेड असेल. त्यामुळे महसुल वाढवावा लागेल. यासाठी पदाधिकाऱ्यांशीही संपर्क ठेवू, असेही त्यांनी सांगितले. ‘अनेक विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. प्रत्येक विभागाची कामाची पध्दत व मर्यादा असते. १०० टक्के मनुष्यबळ मिळणार नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळात चांगले काम करू. मनपा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतल्या गेले हे एक सकारात्मक पाऊल आहे. स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्ररींचा निपटारा करून, मनपाबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढविला जाईल.’याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गरज पडल्यास जनतेत जाऊ
मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांचे शहर असल्याने दडपण नाही. ही संधी आहे. कामाचा आनंद घ्यायचा. सकारात्मक विचार करून, काम पूर्ण करायचे. थेट जनतेशी संवाद राहील. सकारात्मक व नकारात्मक दोन्ही गोष्ट समजेल. जनतेला भेटता येईल. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला भेटण्याची सवय आहे. यामुळे प्रशासनाचीही कामाची पध्दत बदलते.

‘पाणीपुरवठा’ मोठे आव्हान
मनपात कामाचा रोडमॅप तयार आहे. स्वच्छ भारत अभियान अधिक जोरकसपणे राबवू. पुढील काळात पाणीपुरवठयाचे मोठे आव्हान असेल. पाणी कमी असल्याने नियोजन करावे लागेल. हे लघुनियोजन आहे. मात्र, आर्थिक अडचणीतून मार्ग काढणे हे दीर्घकालीन नियोजन असेल, याकडे बांगर यांनी लक्ष वेधले.