नागपूर: सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यादृष्टीने आज (ता. ७) महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सोनेगाव तलावाची पाहणी केली.
यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहेते, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर उपस्थित होते. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सोनेगाव तलावाविषयी माहिती जाणून घेतली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी त्यांनी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आणि कायदेशीर अडचणींबाबत माहिती दिली. यासंदर्भात कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली. येत्या काही दिवसांत यावर चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.