Published On : Mon, Mar 30th, 2020

मनपाच्या बेघर निवाऱ्यांमध्ये वाढ

रस्त्यावरील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्तांचे पाउल


नागपूर: नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘लॉकडाऊन’ दरम्यान परराज्यातून येणा-या आणि फुटपाथवर झोपणाऱ्यांकरिता नवीन बेघर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी पाच निवारा केंद्रांमध्ये बेघरांची व्यवस्था करण्यात आली होती. बेघर नागरिकांची सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने वाढ करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या संसर्गापासून बचावाकरिता प्रत्येक घटकाची काळजी घेतली जात आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर मोठया प्रमाणात बाहेर गावातून लोक नागपूर ला येत आहे. त्यांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था मनपा व्दारे करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेघर निवाऱ्यांमध्ये लाभार्थ्यांची डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’ दरम्यान रस्त्यावरील लोकांसाठी व्यवस्था उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष पुढाकार घेतला आहे. नागपूर शहरामध्ये यापूर्वी पाच शहरी बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यात भर म्हणून तुली हॉस्टेल कोराडी रोड, मेट्रो स्टेशन खापरी, अग्रसेन भवन रवीनगर, अग्रसेन भवन गांधी बाग सी.ए.रोड, एल्केम साऊथ एशिया प्रा.लि. हिंगणा रोड, स्वराष्ट्र लेवा पटेल समाज रेवती नगर बेसा, शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह सदर हे नवे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. एकूणच मनपाद्वारे १२६२ क्षमतेचे नवीन बेघर निवारा केंद्र सुरू केले आहेत.


रस्त्यावरील कोणत्याही बेघराला निवारा केंद्रात पोहोचविण्यात यावे. विशेष म्हणजे स्वतःची काळजी घेत लाभार्थ्यांच्याही सुरक्षा जपली जावी. निवाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक लाभार्थ्याने हात स्वच्छ धुवावे. याशिवाय दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित सामाजिक अंतर पाळणे व इतर खबरदारीबाबत माहिती देण्यात यावी. याशिवाय ज्या बेघरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशांची विशेष काळजी घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी व आवश्यक तो औषधोपचार करण्यात यावा, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

भोजन व्यवस्थेसाठी पुढे या
बेघर निवाऱ्यांमधील भोजन व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी म.न.पा.चे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम (मो.नं.९८२३३३०९३४) उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे (मो.क्र.- ९७६५५५०२१४) आणि दीनदयाल अंत्योदय योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रमोद खोब्रागडे (मो.क्र. ९९२२०९३६३९) यांचेशी संपर्क साधावा.