Published On : Mon, May 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील नाईट कल्चरमुळे गुन्हेगारीत वाढ;पहाटेपर्यंत सुरू हुक्का पार्लर, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न?

नागपूर : शहरातील हुक्का पार्लर, पब आणि वाढत्या नाईट कल्चरमुळे नागपूरकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही शहरातील अनेक भागांत पहाटेपर्यंत हुक्का पार्लर सुरू राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शनिवारी उशिरा रात्री सदर आणि माउंट रोड परिसरातील एका हॉटेलचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये पहाटेपर्यंत ग्राहकांची वर्दळ दिसून येत असून, रात्री साडेतीन ते चार वाजेपर्यंत युवक-युवती आणि कपल्स हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. हॉटेलमध्ये प्रवेशासाठी व्यवस्थापकाची परवानगी घेतली जात असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे.

रामदासपेठ, धरमपेठ, सिव्हिल लाईन्स, सदर आणि माउंट रोडसारख्या पॉश भागांमध्ये अनेक पब आणि हुक्का पार्लर उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा आहे. यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. एमडी ड्रग्ससह अमली पदार्थांच्या प्रकरणांत वाढ होत असल्याने पालक वर्गातही अस्वस्थता आहे.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 159,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,000 /-
Silver/Kg ₹ 2,70,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर पोलिसांनी यापूर्वी अनेक हुक्का पार्लरवर छापे टाकून कारवाई केली होती. मात्र काही दिवसांतच हे व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने कारवाईच्या प्रभावीतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, शनिवारी मध्यरात्री महाल परिसरात फायरिंगची घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तीन दुचाकींवर आलेल्या सहा युवकांनी दोन राऊंड गोळीबार करून पळ काढल्याची माहिती असून, या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वाढणारे छेडछाड, गँगवॉर, रस्ते अपघात आणि तरुणांमधील व्यसनाधीनतेच्या घटनांमुळे नागपूरकरांमध्ये चिंता वाढत आहे. अवैध हुक्का पार्लर आणि उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पब संस्कृतीवर पोलिस प्रशासन कठोर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement