Published On : Tue, Feb 9th, 2021

सेवाग्राम विकास आराखडयातील अपूर्ण कामे आणि सोलर पॅनल निर्मिती करणाऱ्या राज्यातील एकमेव प्रकल्पाला देणार गती – उपमुख्यमंत्री

Advertisement

– वर्धा जिल्ह्याची अतिरिक्त निधी मागणीचा विचार मुंबईच्या बैठकीत करणार, जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री सुनील केदारांकडून 272 कोटींची अतिरिक्त मागणी

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखडयातंर्गत मंजूर असलेला तसेच आराखड्यातील लोकार्पण कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कामे पूर्ण करण्यासाठी घोषित केलेला निधी देण्यासोबतच महिला बचत गटामार्फत राज्यातील पहिल्याच सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पास गती देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना नियोजन आराखडा अंतिम करण्यासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली, यावेळी वर्धा जिल्ह्याच्या बैठकित श्री पवार बोलत होते.

या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार , जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, आमदार अभिजित वंजारी, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त संजीव कुमार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुरणे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना 2021- 22 सर्वसाधारण अंतर्गत जिल्ह्याच्या विकासा साठी प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारती, वर्गखोल्या, धोकादायक इलेक्ट्रिक पोल, पूर संरक्षण भिंत, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी शेड, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस व आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा, अपारंपारिक ऊर्जा विकास इत्यादी बाबींसाठी 272 कोटी रुपये अतिरिक्त देण्याची मागणी पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊ असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी श्री पवार म्हणाले, सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत संपूर्ण कामासाठी मंजूर केलेला निधी देण्यात येईल तसेच या आराखड्यांतर्गत झालेल्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून निधी उभारावा. निधी उभारणे शक्य झाले नाही तर जिल्हा वार्षिक योजनेतून सदर कामासाठी निधी देण्याचा विचार करण्यात येईल.

वर्धा जिल्ह्यात महिला बचत गटांकडून सोलर पॅनल निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. मागासवर्गीय महिला बचत गटाकडून निर्मित होणारा देशातील अशा प्रकारचा दुसरा व राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणारे सोलर पॅनलची गुणवत्ता अपारंपारिक ऊर्जा विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तपासून त्याचा अहवाल सादर करावा. सदर बचत गटामार्फत निर्मित सोलर पॅनलची गुणवत्ता उत्तम असल्यास राज्यातील अपारंपारिक ऊर्जा निर्मिती साठी आवश्यक असलेले सोलर पॅनल महिलांच्या या कंपनीकडून खरेदी करू अशी ग्वाही देत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील तेजस्वी सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पाला गती देण्याची बाब अधोरेखित केली.

यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेचे कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून त्यांचे अनुदान निधीअभावी प्रलंबित आहे. सदर अनुदानासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच जलयुक्त शिवार योजने मधून यशोदा नदी पुनरुज्जीन करण्यासाठी कमलनयन बजाज फाउंडेशन, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासन यांनी संयुक्तपणे काम केले आहे. त्यातील राज्य शासनाचा प्रलंबित हिस्सा अकरा कोटी रुपये मिळावा, तसेच समृद्धी महामार्गाचे कामाकरता लागणारे गौण खनिजाचे स्वामित्व धनाचे 10% रक्कम जिल्हा खनिज निधी अंतर्गत जिल्ह्याला मिळायला हवी, सदर रक्कम जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने रस्ते विकास महामंडळाशी चर्चा करावी अशी मागणी पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केली. याबाबत श्री मोपलवार यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे श्री पवार यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्ह्यातील अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.