खात-धानला येथे कुस्त्यांची दंगल व संगीत खडा तमाशा पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर: मौदा तालुक्यातील खात-धानला येथे परंपरागत कुस्त्यांची दंगल व संगीत खडा तमाशाचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा या भागात जपली जात आहे.

या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खा. कृपाल तुमाने, आ. टेकचंद सावरकर, राजू सोमनाथे, चांगोजी तिजोरी, निशा सावरकर, योगेश वाडीभस्मे, भगवान आखरे, नरेश मोटघरे, कैलास वैद्य, तेजराम गिर्‍हेपुंजे प्रामुख्याने उपस्थित होते. नवीन ग्रामपंचायत बाजार चौक खात येथे या कुस्ती दंगलीचे उद्घाटन झाले.

पश्चिम महाराष्ट्रात कुस्ती हा खेळ अजून मोठ्या उत्साहाने खेळला जातो. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागानेही या खेळाची परंपरा जपली आहे. या कुस्त्यांच्या स्पर्धेमध्ये विविध ठिकाणांहून आलेले सुमारे 50 कुस्त्यांचे संघ सहभागी झाले आहेत. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ग्रामीण भागात चालणारा हा एक मनोरंजनाचा प्रकार असल्यामुळे या स्पर्धांना गावकर्‍यांची, तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.


या कुस्त्यांच्या स्पर्धामध्ये एलईडी टीव्ही, सायकल, कुलर अशी एकूण 10 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. हनुमान शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ही कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे.

संगीत खडा तमाशा
दिवाळीत भाऊबीजेनिमित्त धानला येथे संगीत खडा तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. मनोरंजनाच्या या उपक्रमांमध्ये ग्रामीण भागातील सर्व मंडळी एकत्रित येऊन या उपक्रमात सहभागी होतात. कलंगी शाहीर मंडळी मोहाळी येथील शाहीर माणिकराव देशमुख व त्यांच्या साथीदारांनी हा संगीताचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमालाही पालकमंत्री बावनकुळे व वरील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. अनेक वर्षांपासून मौदा तालुक्यात ही परंपरा जपली जात असून गावकर्‍यांची साथही या कार्यक्रमांना चांगली मिळत असते.