Published On : Thu, Nov 21st, 2019

‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या राज्यातील पहिल्या म्युरलचे लोकार्पण

नागपूर : केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाला बळ देण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर मेट्रोच्या पुढाकाराने येथील कृपलानी चौकात आकर्षक ‘म्युरल’चे लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते बुधवारी (ता. २०) करण्यात आले. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश देणारे अशा प्रकारचे हे राज्यातील पहिलेच म्युरल आहे.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला महामेट्रोचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, व्हीएनआयटीचे अध्यक्ष विश्राम जामदार, माजी महापौर अर्चना डेहनकर, नगरसेविका तारा यादव, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, श्रद्धा पाठक, वर्षा ठाकरे, भाजपच्या बेटी बचाओ अभियानाचे विदर्भ प्रमुख श्रीकांत देशपांडे, नागपूर शहर प्रमुख मनिषा काशीकर, हस्तांकितच्या दीप्ती देशपांडे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, श्री. गुरुबक्सानी, नागपूर मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे, राजू खोरगडे उपस्थित होते.

Advertisement

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नागपूर महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत असते. जनजागृतीचा परिणाम दिसू लागला आहे. मुलींचा जन्मदर वाढला आहे. १००० मागे ९६८ असे प्रमाण आता झाले आहे. केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ’ अभियानाला नागपुरात बळ मिळावे यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संकल्पनेवर आधारीत म्युरल असावे, अशी संकल्पना भाजपच्या बेटी बचाओ अभियानाच्या सदस्यांनी मांडली. मला ती संकल्पना आवडली.

Advertisement

कृपलानी चौक हा नागपूरच्या हृदयस्थानी असून नागपूर मेट्रो या चौकाला आकर्षक रूप दिले आहे. ह्या चौकाची निवड केल्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. कुठलीही चांगली संकल्पना तातडीने अंमलात आणणाऱ्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ह्या संकल्पनेलाही उचलून धरले. अगदी कमी कालावधीत त्याचे निर्माण केले. राज्यातील अशा प्रकारचे हे पहिले म्युरल असून यामुळे बेटी बचाओ अभियानाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बेटी बचाओ अभियानाचे विदर्भ प्रमुख श्रीकांत देशपांडे म्हणाले, भाजपने बेटी बचाओ अभियानाचे शहरनिहाय स्वतंत्र युनीट तयार केले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. फलस्वरूप आज नागपूर शहरात मुलींचा जन्मदर वाढला आहे. हे अभियानाचे यश आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर मेट्रोने पुढाकार घेऊन तयार केलेले म्युरल म्हणजे जनजागृतीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर मेट्रोचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे यांनीही बेटी बचाओ अभियानाची प्रशंसा करीत महापौरांच्या संकल्पनेतून साकारलेले हे म्युरल नागपूर शहराचे आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. माजी महापौर अर्चना डेहनकर यांनीही यावेळी उपक्रमाची प्रशंसा करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भाजपच्या बेटी बचाओ अभियानाच्या शहर प्रमुख मनिषा काशीकर यांनी प्रास्ताविकातून म्युरल निर्मितीचा प्रवास सांगितला. महापौर नंदा जिचकार यांच्या सहकार्याने बेटी बचाओ अभियानाचे स्वप्न सत्यात उतरले याबद्दल त्यांनी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर मेट्रोचे आभार मानले.

यानंतर महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ संकल्पनेवर आधारीत म्युरलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपच्या बेटी बचाओ अभियानाच्या पदाधिकारी संध्या अधाळे, योगिता धार्मिक, लता होलगरे, ज्योत्स्ना कुरेकर, सुमित्रा सालवटकर, बबिता सालवटकर, उषा पटाले, अनुश्री हवालदार, कुंदा बावणे, कल्पना तडस, सोनाली घोडमारे, यशोधरा टेंभुर्डे, संतोष लढ्ढा, अतुल जोगे यांच्यासह मनपा, मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement