Published On : Fri, Sep 29th, 2017

मनपाच्या नियंत्रण कक्षाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे महानगरपालिकेद्वारे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२९) करण्यात आले.

याप्रसंगी वैद्यकीय सेवा ‍व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने, धरमपेठ झोन सभापती महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता डी.डी.जांभूळकर, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौरांनी प्रशासनिक कामाचा आढावा घेतला. महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमी परिसरात २२० पिण्याच्या पाण्याचे अस्थायी नळ लावण्यात आले आहे. याशिवाय दीक्षाभूमी परिसरातील भागात टँकरने पाणी पुरविण्यात येणार आहे. ज्या भागात भोजनदान केले जाते, तेथे टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय परिसरातील विहिरींवर पंप बसविण्यात आले आहे. ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

स्वच्छता विभागाद्वारे नागपूर महानगरपालिकेचे एकूण ५०० सफाई कर्मचारी हे तीन पाळींमध्ये काम करणार आहेत. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यात आली आहे. परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे, वाढलेले गवत कापण्यात आले आहे. महानगरपालिकेद्वारे १०४० टॉयलेट, ८० स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. ठिकठिकाणी तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आले आहे. अंबाझरी परिसरात सहा मोबाईल टॉयलेट उभारण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या विद्युत विभागाद्वारे परिसरात स्थायी ५५ व नऊ अस्थायी स्वरूपातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याशिवाय ध्वनिप्रक्षेपक, ट्यूबलाईट, फ्लड लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोककर्मविभागाद्वारे शासकीय ओद्यौगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भाविकांच्या निवासासाठी शामियाना उभारण्यात आलेला आहे. त्याची पहाणी मान्यवरांनी केली. अग्निशमन विभागाच्या वतीने एक गाडी परिसरात २४ तास तैनात राहणार आहे. दुसरी गाडी काचीपुरा पोलिस चौकीजवळ तैनात करण्यात आली आहे. याशिवाय सहसज्ज बुलेट मोटारसायकलही परिसरात सज्ज करण्यात आली आहे. अंबाझरी तलावात अनुचित प्रकार घडु नये यासाठी बोटीची व्यवस्था व प्रशिक्षणार्थी तैनात केले आहे.

वैद्यकीय विभागाने दीक्षाभूमी परिसरात दोन ॲम्बुलन्सची व्यवस्था ठेवली आहे. ठिकठिकाणी डॉक्टर्सची चमू २४ तास कार्यरत राहणार आहे. शौचालय व स्नानगृहासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे.

परिवहन विभागाद्वारे दीक्षाभूमी परिसरातून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी दीक्षाभूमीकडे येण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय इंदोरा चौक, गरोबा मैदान, मेडिकल, चंद्रमणी नगर येथून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. त्यामुळे त्याठिकाणी अस्थायी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी लक्ष्मीनगर झोनमधील उपअभियंता रवींद्र मुळे, झोनल अधिकारी महेश बोकारे, स्वास्थ निरिक्षक राठोड, कंत्राटदार सादिक भाई, ओसीडब्लुचे अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement