Published On : Fri, Mar 30th, 2018

जळगाव येथे जैन फार्म फ्रेश फूड्सच्या मसाले प्रक्रिया प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव: जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ची सहयोगी कंपनी जैन फार्म फ्रेश फुडसच्या मसाले प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन आज महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन करण्यात आले.

याप्रसंगी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार रक्षा खडसे, आ. चंदुलाल पटेल, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आ. संजय सावकारे, आ. डॉ. सतीश पाटील, आ. हरिभाऊ जावळे, आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. शिरीष चौधरी, आ. उन्मेश पाटील, आ. किशोर पाटील, महापौर ललित कोल्हे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल जैन आदि उपस्थित होते.

सर्वसामान्य नागरिकांना देखील उच्च प्रतीच्या मसाल्याची चव चाखता यावी, या प्रमुख उद्देशाने जैन उद्योग समूहाने या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या मसाले प्रक्रिया प्रकल्पाची वार्षिक क्षमता २४ हजार टन इतकी असून यामध्ये आलं, लसुण, कांदा, मिरची यांची पेस्ट तयार केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोरडा मसाला देखील तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्णत: सुरक्षित आणि उच्च दर्जाचे मसाले ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. एअर फिल्टरच्या माध्यमातून शुद्ध हवेचा पुरवठा केला जाणार असून त्यामुळे मालाचा दर्जा नियंत्रित राखण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे.


या प्रकल्पासाठी जैन उद्योग समुहाने १०० कोटींची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल जळगाव, धुळे, नंदुरबारसह मध्य प्रदेश व गुजरातला लागून असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांकडुन घेतला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कान्हदेशातील शेतकरी जैन फार्मफ्रेश फूडसच्या करार शेतीशी जोडले जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढीस मोठा हातभार लागणार असल्याचे श्री. अशोक जैन यांनी सांगितले. प्रकल्पातून तयार होणारा माल सुरवातीच्या काळात प्रामुख्याने निर्यात केला जाणार आहे. आगामी काळात भारतात उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी केली.