Published On : Mon, Aug 24th, 2020

नवीन संशोधन व तंत्रज्ञानाचा विकासावर तांत्रिक विद्यापीठांनी अधिक भर द्यावा : नितीन गडकरी

अ. भा. तांत्रिक शिक्षण परिषदेचा कार्यक्रम

नागपूर: तांत्रिक विद्यापीठांनी नवीन संशोधन व तंत्रज्ञानाच्या अधिक विकास व्हावा यावर अधिक भर देऊन उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माागास भागाचा विकास करीत गरिबांचे कल्याण व्हावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या एका ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले- ज्ञानाचे आणि कचर्‍याचे संपत्तीत रुपांतर करून देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्याची ताकद नवीन संशोधन आणि उच्च तंत्रज्ञानात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकास करणे, जैविक इंधन निर्मिती करणे, निर्यात वाढविणे, उत्पादन खर्चात बचत करणे, स्वदेशी तंत्रज्ञान या मार्गाने आपल्याला जावे लागणार आहे. सांडपाण्यापासूनही उत्पन्न मिळू शकते हे आम्ही सिध्द केले आहे.


तसेच कचर्‍यापासूनही संपत्ती मिळविता येऊ शकते हेही सिध्द केले आहे. खर्चात बचत करणार्‍या तंत्रज्ञानाची निर्मिती करून ती देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरणे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने करावे अशी अपेक्षाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.

देशातील प्रत्येक भागाची क्षमता काय आहे, त्या भागाच्या कमतरता काय आहेत, याचा विचार करून संबंधित भागाला उपयोगी ठरणारे नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाची निर्मिती करून तेथे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालावर आधारित उद्योगांना व व्यवसायांना चालना कशी देता येईल याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- अगरबत्तीच्या काड्यांचा लहानसा उद्योग आज देशातील 25 लाख लोकांना रोजगार देत आहे. यासाठी 5 हजार मशीन आम्ही नागपूर क्षेत्रात आणल्या आहेत.

कोणत्या भागासाठी कोणती मशिनरी लागणार याचा अभ्यासही या विद्यापीठाने करावा. तंत्रज्ञानाचा संबंध विकासाशी आहे. गरजेनुसार त्यात संशोधन व्हायला पाहिजे. आपल्या तंत्रज्ञानाचा ज्ञानात वृध्दी आणि विकासासाठी उपयोग व्हावा. गावाखेड्यांमध्ये लहान लहान व्यवसाय करणार्‍यांना आवश्यक तंत्रज्ञानाची निर्मिती झाल्यास त्यातून रोजगाराची समस्या संपणार आहे, तांत्रिक विद्यापीठांनी यादृष्टीने विचार करून हे चित्र बदलण्यास मदत करावी असे आवाहनही ना. गडकरी यांनी यावेळी केले.