Published On : Mon, Aug 24th, 2020

सार्वजनिक वाहतूक सीएनजी-एलएनजीवरच फायदेशीर : नितीन गडकरी

यूआयटीपी इंडिया बस सेमिनार लंडन मॉडेल देशातही सुरु व्हावे

नागपूर: मोठ्या शहरांमध्ये असलेली सार्वजनिक वाहतूक डिझेलऐवजी सीएनजी-एलएनजी या इंधनावर करण्यात आली तरच ती फायदेशीर ठरू शकते. वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक किंवा जैविक इंधनाचा वापर ही आता काळाची गरज ठरणार असल्याचे केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

युआयटीपी इंडिया बस सेमिनारमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत असताना ते बोलत होते. ना. गडकरी पुढे म्हणाले की, राज्य सरकारे सार्वजनिक वाहतूक करताना तोट्यात आहे. कारण डिझेलसारख्या महागड्या इंधनाचा वापर केला जातो. यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आणि प्रदूषणात वाढ होते. त्याऐवजी इलेक्ट्रिक, सीएनजी, बायो सीएनजी, एलएनजी, मिथेनॉल, इथेनॉलचा वापर झाला तर सार्वजनिक वाहतूक ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. शहरात चालणार्‍या सिटी बस, स्कूल बस, औद्योगिक क्षेत्रासाठी वापरल्या जाणार्‍या बस या सीएनजीवर चालाव्या. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी चालविण्यात येणार्‍या बस व ट्रक एलएनजीवर चालविण्यात याव्या. किंबहुना डिझेल बसचे एलएनजी-सीएनजीमध्ये रुपांतर करण्यात यावे. यासाठी लागणारा खर्च दोन वर्षात वसूल होतो, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

आपल्या देशातही सार्वजनिक वाहतुकीसाठी लंडन मॉडेलचा वापर करणे आता आवश्यक असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- लंडनमध्ये बस ऑपरेटरच गुंतवणूक करतो. ऑपरेटरला स्थानिक प्रशासन आणि शासनाने परवानगी दिली आहे. मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी डिझेल बसला 150 रुपये प्रतिकिमीचा खर्च येतो, इथेनॉलवर चालणार्‍या बसला 78 रुपये, तर इलेक्ट्रिकवर चालणार्‍या बसला 50 रुपये प्रतिकिमी असा इंधनाचा खर्च येतो. हे लक्षात घेतले तर इलेक्ट्रिक बस ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. आसाम राज्यात मिथेनॉल या इंधनाचा वापर अधिक आहे. वाहतूक स्वस्त आणि परवडणारी राहील यासाठी इंधन क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान शोधण्याचे कामही करण्याची गरज आहे. ट्रॉली बसही इलेक्ट्रिकवर धावत आहेत.

ही बस वाहतूकही इंधनासाठी डिझेलच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आहे. याचाही विचार व्हायला पाहिजे. सार्वजनिक खाजगी सहभागातून बस पोर्ट हे विमानतळांसारखे विकसित करण्याच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. या दृष्टीने विचार केल्यास देशात वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या खूप क्षमता आहेत, असेही ते म्हणाले.

डबल डेकर बस सेवेतही इंधनाची बचत होते, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- दिल्ली जयपूर, दिल्ली लुधियाना, मुंबई पुणे, मुंबई नाशिक या जवळच्या प्रवासासाठी जैविक इंधनावर चालणारी वाहतूक फायदेशीर ठरली आहे. नावीन्यपूर्ण मॉडेल आणि गुंतवणूक ही या क्षेत्राची गरज आहे, असेही ते म्हणाले.