Published On : Mon, Aug 26th, 2019

पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते नेत्रदानविषयक महारॅलीचे उद्घाटन

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडीकल) येथील नेत्रविभागाच्या वतीने नेत्रदान पंधरवड्याचा आरंभ झाला. नेत्ररोग विभागातर्फे 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान 34 व्या ‘नेत्रदान पंधरवड्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. नेत्रदानाविषयी जनजागृती माहितीपटाचे व महारॅलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

सन्माननीय अतिथी म्हणून आमदार सुधाकर कोहळे, संकेत बावनकुळे उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, नेत्रविभाग प्रमुख डॉ. अशोक मदान, आय बँक संचालक डॉ. राजेश जोशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बुबुळ प्रत्यारोपण व रेटीनाचे उपचार करण्यासाठी नेत्रविभागाला एका सुसज्ज नेत्रालयाचे स्वरुप देणे काळाची गरज आहे. जेणेकरुन नेत्रसंबंधीच्या सर्व चाचण्या व उपचार एकाच ठिकाणी होऊ शकतील व रुग्णाला तपासण्या करण्यास त्रास होणार नाही. यासाठी भरीव निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. सर्वांनी नेत्रदान करण्याचे आवाहनही श्री. बावनकुळे यांनी यावेळी केले.

आमदार सुधाकर कोहळे यांनी नेत्रविभागाच्या निरंतर होणाऱ्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले व नेत्रदान पंधरवड्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात स्किन बँक, मिल्क बँक व आय बँक यासाठी वेगवेगळी सुविधा करण्यात येणार असल्याचे सूचित केले.

नेत्रविभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी बुबुळाच्या आजारामुळे होणाऱ्या अंधत्वाबाबत माहिती दिली. नेत्र विभाग हा आधुनिक उपकरणांनी परिपूर्ण असून बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत नेत्र विभाग, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर हे संपुर्ण महाराष्ट्रात अग्रस्थानी आहे. येणाऱ्या काळात कॉर्निया रिसर्च लेबॉरेटरी बनविण्यासाठी नेत्र विभाग प्रयत्नशिल असल्याचे डॉ. मदान यांनी सांगितले.

नेत्रदानाविषयी जनजागृती महारॅलीमध्ये ‘मेडीकल’चे विद्यार्थी, नर्सिंगचे विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी असे मिळून जवळपास एक हजार लोकांनी भाग घेतला. रॅली नेत्र विभागातून सुरु करण्यात आली. नंतर मेडीकल चौक, क्रीडा चौक, तुकडोजी चौक येथून परत मेडीकल कॉलेज येथे आली. ‘नेत्रदान श्रेष्ठदान’, ‘मरणाआधी रक्तदान मरणानंतर नेत्रदान’ अशा नाऱ्यांनी परिसदर दुमदुमला. डॉ. प्रिती वाडेकर व डॉ. फौजीया नाझ परविन यांनी जनतेला नेत्रदानासाठी प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाला स्त्रिरोग शास्त्र विभाग प्रमुख डॉ. फिदवी, औषधीवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बनसोड, गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता, बधिरीकरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तिरपुडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ.दिप्ती जैन यांची विशेष उपस्थिती होती.

नेत्रदान पंधरवड्या दरम्यान नागपूर येथे विविध ठिकाणी नेत्रशिबिरे व नेत्रदानाविषयी जनजागृती विषयक कार्यक्रम घेतले जातील, अशी माहिती डॉ. मदान यांनी दिली.

उद्घाटन सोहळा व रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ. मदान यांच्या मार्गदर्शनात डॉ. राजेश जोशी, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. स्नेहल बोंडे चौरसिया, डॉ. निलेश गद्देवार, डॉ. मिनल व्यवहारे, डॉ. निदा रजा व डॉ. वंदना अय्यर यांनी परिश्रम घेतले. तसेच नेत्रविभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, बी.पी.एम.टी. विद्यार्थी, नेत्रविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. ऐश्वर्या नायक, डॉ. निवेदिता पाटील, डॉ. सोनाली तांबोली व डॉ. नम्रता बन्सोडे यांनी केले.