Published On : Mon, Aug 26th, 2019

बीना-भानेगाव वेकोलि पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला 15 दिवसात देणार

Advertisement

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वेकोलिचे आश्वासन

नागपूर: वेस्टर्न कोल फील्डसच्या बीना भानेगाव खाणीच्या शिल्लक असलेल्या प्रकल्पग्रस्तांचा जमिनीचा मोबदला येत्या 15 दिवसात दिला जाईल, असे आश्वासन वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी आज दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात एक बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले.

या बैठकीला संजय कुमार, मुरारी चौधरी, गोखले, परांजपे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. शोएब अली, भुलन तिवारी, सीताबाई भडंग व इतर यांच्या संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला 15 दिवसात देण्यात येणार आहे. तसेच बीना येथील 40-50 घरांचे मूल्यांकन करून त्यांनाही मोबदला देण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभाग या घरांचे मूल्यांकन करणार आहे.

मौजा बीना येथील 650 एकर शेतजमीन वेकोलिद्वारे कलम 4 घोषित करून संपादन करीत असल्याने बिना गावाचे पुनर्वसन वेकोलिने करावे अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली होती. बीना खाणीतून 6 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा निघणार असून हा कोळसा महानिर्मितीला इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त पडणार आहे. केंद्र शासन या खाणीच्या पुनर्वसनासाठी 84 कोटींपेक्षा अधिक निधी देण्यास तयार नाही.

अशा स्थितीत महानिर्मितीला होणारा 15 कोटींचा फायदा लक्षात घेता. महानिर्मितीने पुनर्वसनासाठी लागणारा अधिक खर्च द्यावा अशी भूमिका घेण्यात येण्याची शक्यता आहे.