Published On : Sat, Nov 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भविष्‍यात शिक्षणाचे व्‍यापारीकरण थांबेल; ‘सुपर ३०’चे जनक पद्मश्री आनंद कुमार यांचे विधान

नागपूर पुस्तक महोत्सव’ मध्‍ये विशेष मुलाखत
Advertisement

नागपूर: आपल्‍याकडे शिक्षणाचे व्यापारीकरण फार पूर्वीपासून झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना रट्टूपोपट बनविल्या जात आहे. विद्यार्थी अधिकाधिक गुण मिळविण्याच्या मागे धावत आहे. पण, ही परिस्थिती बदलणार असून येत्या पंधरा वर्षांत कोचिंग क्लासेसचे हे व्यापारीकरण थांबून जाईल, असे मत ‘सुपर ३०’चे जनक पद्मश्री आनंद कुमार यांनी केले.

नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडियाच्‍यावतीने व महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदानावर नऊ दिवसीय ‘नागपूर पुस्‍तक महोत्‍सव 2025’ सुरू असून शुक्रवारी पत्रकार वेद घुळघुळे यांनी त्‍यांची मुलाखत घेतली.

‘सुपर ३०’ अर्थात ३० हुशार मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य थांबविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. माफिया, गुंडे यांनी त्रास दिला. प्रचंड धमकावले. त्यावेळी हे सर्व बंद करून द्यायला हवे, असा विचार मनात आला. तेव्हा मला माझे गुरू डी. पी. वर्मा सरांनी सांगितले की, हे कार्य तू स्वत:साठी नव्हे तर समाज परिवर्तनासाठी करत आहे, हे लक्षात ठेव आणि लोकांच्या त्रासाकडे-टीकेकडे लक्ष देऊ नको. त्यांनी दिलेली ती शिकवण मला आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरली. त्या शिकवणीमुळेच अनेक अडथळे येऊनही सुपर ३० सुरू राहिले. या संपूर्ण प्रवासात जे काही करायचे सर्वोत्कृष्टच करायचे, ही वडिलांची शिकवणदेखील मोलाची ठरली’, असे ते म्हणाले. महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे केबीसीमध्ये २५ लाख कसे जिंकलो, अभिनेते हृतिक रोशन यांनी ‘सुपर ३०’मध्ये साकारलेली मुख्य भूमिका आदींबाबत त्‍यांनी माहिती दिली. तत्पूर्वी, जुई पांढरीपांडे लिखित ‘हरित : एव्हरीडे सस्टनेबल अॅक्शन’, डॉ. मानसी सगदेव-मोहरिल लिखित ‘अनुभूती’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.

‘वाचन’संस्‍कृतीचा प्रवास ‘दर्शन’संस्‍कृतीकडे – प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे
आज आपण ‘वाचनसंस्कृती’तून ‘दर्शनसंस्कृती’कडे प्रवास करतो आहोत. माध्यमांचे स्वरूप बदलत आहे. साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत असले तरी त्‍याचे वाचन होताना दिसत नाही. सोशल माध्‍यमांवरचे वाचन वाढले आहे. पण नेमके काय वाचावे यामध्‍ये वाचकांचा गोंधळ होताना दिसतो आहे. अशा अशा काळात समीक्षकांची अधिक आवश्यक आहेत, असे प्रतिपादन लेखक, समीक्षक व बिंझाणी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले.

Advertisement

नागपूर पुस्‍तक महोत्‍सव – 2025 मध्‍ये ‘लेखक मंच’ मध्‍ये डॉ. नाईकवाडे यांची मुलाखत प्रा. प्रणाली राऊत यांनी घेतली.

त्यांच्या ‘राजसी’ या प्रेमपत्रसंग्रहातील साहित्यिक आणि सामाजिक आयामांवर मनोगत व्यक्त करताना ते म्‍हणाले, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा संग्रह आहे. जेव्हा भावना शब्दरूप घेतात तेव्हा ते साहित्य जन्माला येते असे ते म्‍हणाले.

कवितेबाबत बोलताना डॉ. नाईकवाडे म्हणाले, “कविता ही अत्यंत गंभीर आणि संवेदनशील सर्जनप्रक्रिया आहे. व्यक्तिमत्व जसजसे बदलते, तशी कविता बदलते आणि त्या प्रवासातूनच खरा कवी उदयास येतो. दुःखातून फुललेली कविता अभिजाततेच्या अधिक जवळ असते. कविता जाती-धर्म-वादाच्या चौकटीत नसते; तिचे मूळ भावनेच्या गाढतेत असते.

त्‍यानंतर इन्‍फ्यूएन्‍सर व लेखक निखिल चंदवानी यांची मुलाखत लखेश चंद्रवंशी यांनी घेतली. ते म्‍हणाले, भारत ही अतिशय पावन भूमी असून या भूमीत आपण जन्‍माला आलो हे आपले भाग्‍य आहे. आपण आपल्‍या कुटुंब, देशाप्रती असलेले कर्तव्‍य, जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्‍यांनी केले. त्‍यांनी युवा श्रोत्‍यांना मोबाईलपासून दूर राहण्‍याचा सल्‍ला दिला.

त्‍यानंतर युवा लेखिका अंजली रुंगटा यांनी श्रोत्‍यांशी संवाद साधला. मानसिक आरोग्‍य आणि युवा पिढीवर लेखन करणा-या अंजली यांनी त्‍यांच्‍या पुस्‍तकांमधून वातावरणात होणा-या बदलांना थांबवण्‍यासाठी काय उपाययोजना केल्‍या पाहिजे याची माहिती दिली. त्‍यांनी रिसायकल केलेल्‍या कागदाची पुस्‍तके तयार करण्‍याचा मानस बोलून दाखवला.

डॉ. मोहन भागवत यांचा 29 रोजी युवा लेखकांशी संवाद –
राष्‍ट्रीय पुस्‍तक महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने निमंत्रित युवा लेखकांशी संवादाचा कार्यक्रम ‘भारतबोध : युवा लेखक संवाद’ दिनांक 29 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्‍यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक प. पू. डॉ. मोहनजी भागवत युवा लेखकांशी संवाद साधतील व त्‍यांना मार्गदर्शन करतील. नॅशनल बुक ट्रस्‍टचे अध्‍यक्ष प्रो. मिलिंद सुधाकर मराठे यांची विशेष उपस्‍थ‍िती राहणार आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे, असे झिरो माईल फाउंडेशनचे अध्‍यक्ष अजय संचेती, संचालक प्रशांत कुकडे, समय बनसोड व कल्‍याण देशपांडे यांनी कळवले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.