Published On : Sat, Nov 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नगरपंचायत निवडणुका २०२५ : मतदान वाढवण्यासाठी २ डिसेंबरला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Advertisement

नागपूर – राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रचाराने तापलेल्या वातावरणात राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. आगामी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाचा दिवस असल्याने सर्वांना मताधिकाराचा वापर सुलभ व्हावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने ही सुट्टी देण्यात आली आहे.

२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान-
राज्यातील कोकण (२७), नाशिक (४९), पुणे (६०), छत्रपती संभाजीनगर (५२), अमरावती (४५) आणि नागपूर (५५) या विभागांसह एकूण २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे.
या निवडणुकीत १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. तसेच, सर्वच ठिकाणी EVM द्वारे मतदान घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

१० नवीन नगरपरिषद आणि १५ नवीन नगरपंचायतींचा सहभाग-
या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यावेळी १० नवीन नगरपरिषद आणि १५ नव्या नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रात प्रथमच अशा स्वरूपाची निवड प्रक्रिया पाहायला मिळणार आहे.

दुबार नावांवर कडक तपासणी-
मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांवर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अत्याधुनिक टुलच्या मदतीने दुबार मतदार ओळखण्यात आले असून अशा नावासमोर ‘डबल स्टार’ करण्यात आले आहे. मतदानाच्या वेळी डबल स्टार असलेला मतदार उपस्थित झाला, तर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतले जाईल—
त्याने इतर कोणत्याही केंद्रावर मतदान केलेले नाही आणि पुढे करणार नाही, अशी स्पष्ट नोंद त्यात असणार आहे.

Advertisement

मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न-
प्रचारासाठी मुदतवाढ दिल्यानंतर मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यामागे आयोगाचा स्पष्ट हेतू म्हणजे नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करता यावे. मतदानातील घसरण थांबवून सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.

राज्यातील ही महत्त्वाची निवडणूक २ डिसेंबरला पार पडेल, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. नागरिकांनी आपल्या मताधिकाराचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम नेतृत्व देण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.