नागपूर : विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र शेतकऱ्यांना पहिल्याच पावसात मोठा फटका बसला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
हिंगण तालुक्यातील खैरी पन्नासे शिवारात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नाला खोलीकरणाचे काम अद्यापही सुरु करण्यात आले नाही. शिवाय ज्या भागात खोलीकरण झाले त्या भागातील आजूबाजूला असलेल्या शेतातील गाळ नाल्यात येणार नाही यासाठी बांध तयार करण्यात आला नाही. त्यामुळे सोमवारी पहाटे काही तास आलेल्या पहिल्याच पावसात या नाल्याच्या बाजूला असलेल्या अभिमान झाडे, रमेश पन्नासे, लल्लन पाल, जगन ठाकरे आदी पाच सहा शेतकऱ्यांच्या शेतातील उपयुक्त माती व गाळ वाहून या नाल्यात गेला. यातील काही शेतात पेरणी सुद्धा करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आता पावसाला केवळ सुरुवात झाली असून शासनाने या कामाची पाहणी करून शेताचे नुकसान होऊ नये यासाठी नाला व्यवस्थित करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.