नागपूर : मध्य प्रदेशातील पचमढी येथे माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्नात नागपूरच्या एका शिक्षकाचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सकाळी प्रियदर्शिनी दृश्यस्थळावर ही दुर्दैवी घटना घडली. विजय नाईक (४०, रा. खानखोजे नगर, नागपूर) असे मृत शिक्षकाचे नाव असून ते रामदासपेठ येथील सोमलवार शाळेत कार्यरत होते.
विजय नाईक हे २० विद्यार्थ्यांच्या समूहासह पचमढी येथे सहलीसाठी गेले होते. दृश्यस्थळावर छायाचित्र काढत असताना एका माकडाने त्यांची बॅग पळवली. ती परत मिळवण्यासाठी त्यांनी सुरक्षा कठडा ओलांडला. मात्र, याचवेळी तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले. विद्यार्थ्यांसमोर घडलेल्या या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम भाग आणि खोल दरीमुळे बचावकार्यात अडथळे आले. पोलिसांना सुमारे तीन किलोमीटर पायी चालत घटनास्थळी पोहोचावे लागले. तब्बल साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास स्ट्रेचरच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या सहलीत विजय यांचे वडीलही त्यांच्यासोबत होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेमुळे नागपूरमध्ये शोककळा पसरली असून पर्यटनस्थळांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माकडांचा उपद्रव आणि धोकादायक ठिकाणी असलेल्या सुरक्षा कठड्यांच्या व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बॅगेसाठी केलेला प्रयत्न शिक्षकाच्या जीवावर बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




