नागपूर – स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश महिला नेत्या असल्याचे भासवून, पाच सुशिक्षित बेरोजगार युवकांना मेट्रोमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख ८० हजारांची फसवणूक करणाऱ्या प्रतिभा पाटील (५०, रा. कुकडे ले-आऊट, मानवता शाळेजवळ) या महिलेला आता कायद्याचा सामना करावा लागणार आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाली ठगी-
फिर्यादी महिलेस प्रतिभा पाटील हिची ओळख नोव्हेंबर २०२२ मध्ये झाली. त्यावेळी प्रतिभाने तिचे बडे राजकीय नेते, अधिकार्यांशी जवळचे संबंध असल्याचे सांगत, मेट्रोमध्ये नोकरी लावण्याचे आश्वासन दिले.
६ ते ७ लाखांच्या मागण्या, अग्रीम रक्कम उकळली-
प्रतिभा हिने मेट्रोमध्ये लिपिक पदासाठी ६ लाख, तर उच्च पदांसाठी ७ लाख रुपये द्यावे लागतील, अशी माहिती दिली. प्रत्येकी २ लाखांची अग्रीम रक्कम देण्यास सांगितले गेले. तिच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादीसह पाच युवकांनी वेळोवेळी तिला रक्कम दिली.
तीन वर्षात नोकरी नाही, रक्कमही नाही-
नियुक्तीचे आदेश एका महिन्यात मिळतील असे सांगूनही २०२२ पासून २०२५ पर्यंत कोणालाही नोकरी मिळाली नाही. उलट प्रतिभा पाटीलने पैसेही परत केले नाहीत. शेवटी तिने विश्वासघात करत फसवणूक केल्याचे उघड झाले.
पोलिसांकडून शोध सुरू-
फसवणूक झाल्याची खात्री पटताच फिर्यादी महिलेने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रतिभा पाटीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांचे पथक तिच्या शोधात आहे.