
नागपूर:काका–पुतण्यांमधील मालमत्तेच्या वादातून झालेल्या गोळीबारात निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विजय म्यानावार (वय ३७) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गुमगाव येथे राहणाऱ्या नाना देवतळे यांचा त्यांच्या पुतण्या नितीन आणि प्रवीण देवतळे यांच्याशी दीर्घकाळापासून मालमत्तेवरून वाद सुरू होता. २४ डिसेंबर रोजी संतप्त नाना देवतळे यांनी पुतण्यांवर गोळीबार केला. मात्र १२ बोअर बंदुकीतून सुटलेली एक गोळी तेथे उपस्थित असलेल्या विजय म्यानावारला लागली. नितीन देवतळे यांनीच विजयला आपल्या घरी कामासाठी बोलावले होते आणि त्याचवेळी हा प्रकार घडला.
गोळी लागल्यानंतर विजय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. सोमवारी संध्याकाळी त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. उपचारासाठी मोठा खर्च झाला असून, विजयच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता रुग्णालय व्यवस्थापनानेही काही रक्कम माफ केल्याची माहिती आहे.
दरम्यान, विजयच्या नातेवाईकांनी देवतळे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. विजयच्या मृत्यूनंतरही संबंधितांनी मदतीचा हात तर सोडाच, साधा सांत्वनपर फोनही न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नातेवाईक निखिल यांनी सांगितले की, समाजातील अनेक लोक आणि ओळखीचे व्यक्ती मदतीसाठी पुढे आले, मात्र देवतळे कुटुंबाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अटक टाळण्यासाठी नितीन देवतळे उपचाराचा बनाव करत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. नितीनवर यापूर्वीच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून, गोळी झाडणाऱ्या नाना देवतळेला कठोर शिक्षा व्हावी, तसेच विजयच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवून नितीनवरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी विजयच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.








