नागपूर :मुलगा रडत असल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीशी वाद घातला. हा वाद शिगेला पहोचला आणि त्यातून पतीने पत्नीची गळा चुरून हत्या केल्याची माहिती आहे.मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
बिस्ताबाई चंद्रदयाल मसकुले (२५) असे मृतक महिलेचे नाव असून चंद्रदयाल (२६) हा आरोपी पती आहे. हे दोघेही छत्तीसगढ येथील रहिवाशी असून प्रकाशनगर येथील एका निर्माणाधीन इमारतीत ते मजुर म्हणून कामाला होते. त्यांना तीन वर्षांचा लहान मुलगा आहे.
माहितीनुसार,गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रदयालच्या मुलाला भूक लागली व तो रडू लागला. त्याचा आवाज ऐकून चंद्रदयाल संतापला व त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र हा वाद इतका चिघळला की तिचे बोलणे ऐकून तो आणखी संतापला व भाजी कापण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत ती इमारतीतून बाहेर पडली व खाली कोसळली. आरडाओरड ऐकून इतर मजूर धावले.
त्यांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपी पतीला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.