नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपुरात दाखल झाले असून त्यांची भेट घेण्यासाठी शहरातील शासकीय देवगिरी बंगल्याबाहेर भाजपचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी उसळली आहे.
यादरम्यान पश्चिम नागपूरचे भाजप नेते पुष्कर प्रोजेक्टीवार हे देखील आपल्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांचा डीसीपी राहुल मदने यांच्याशी मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
माहितीनुसार, भाजप नेते पुष्कर प्रोजेक्टीवार हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी देवगिरी बंगल्याच्या एक्सिट प्रवेशद्वारातून आता जात होते. मात्र प्रोटोकॉलनुसार हे चुकीचे असल्याने डीसीपी राहुल मदने यांनी त्यांना अडविले. यानंतर प्रोजेक्टीवार यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका चिघळला की डीसीपी राहुल मदने यांच्याशी त्यांनी धक्काबुक्की केली. यासंदर्भातला व्हिडीओही समोर आला आहे. या प्रकरणात काही स्थानिक नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद वेळीच शांत झाला. अन्यथा एखाद्या लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी भाजप नेत्या विरोधात आयपीसी ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता.