नागपूर : रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत एका युवकाचा विजेच्या तीव्र धक्क्यामुळे जागीच मृत्यू झाला. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर उभी असलेल्या मालगाडीवर चढताना हा युवक ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) वायरच्या संपर्कात आला आणि काही क्षणांतच खाली कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३५ वर्षांचा हा युवक दुपारी साडेतीनच्या सुमारास स्थानक परिसरात फिरत होता. त्यानंतर त्याने गुड्स सायडिंगमध्ये उभी असलेल्या कोळसा भरलेल्या मालगाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रेनच्या छतावर पोहोचताच वरून जाणाऱ्या उच्चदाब ओएचई वायरचा त्याला स्पर्श झाला. त्यामुळे जोरदार विजेचा धक्का बसून तो खाली पडला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे काही काळासाठी ओएचई वायरमध्ये बिघाड निर्माण झाला आणि विद्युत पुरवठा खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. काही वेळातच सेवा सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, शासकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून तो भिकारी किंवा मानसिक आजाराने ग्रस्त असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी दिली.









