नागपूर : नागपुरात १५१ शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांची तब्बल ११३ कोटींनी फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी मौदा पोलिसांनी १८पेक्षा अधिक जणांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.
रमण्णाराव मुसलिया बोल्ला, वीर व्यंकटरावर सत्यनारायण वाकलकुडी, महिंद्रा मुप्पू वारको, कॉर्पोरेशन बँकेचे व्यवस्थापक मन्शुराम पाटील (मृतक), संदीप जगनाडे व एनसीएमएल कंपनीचे तत्कालीन अधिकारी, रमण्णा बोला यांच्या विविध १२ कंपन्यांचे संचालक व अन्य, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फसवणूक झालेले शेतकरी मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील आहेत.
माहितीनुसार, २०१७मध्ये जिल्ह्यात ओला दुष्काळ पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. बोल्ला याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळत असल्याचे सांगितले. त्याने साथीदारांच्या मदतीने एकामागून एक तब्बल १५१ शेतकऱ्यांना सदरमधील किंग्जवेवरील कॉर्पोरेशन बँकेत आणले.
तेथे त्यांच्याकडून आधारकार्ड व पॅनकार्ड घेतले. त्यांचे खाते उघडले. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून चेकबुक घेतले. त्यावर १५१ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन धनादेश स्वत:जवळ ठेवले. त्यानंतर बोल्ला व त्याच्या साथीदारांनी बनावट दस्तऐवजाद्वारे धान्याच्या मोबदल्यात कर्ज मिळविण्यासाठी बँकेत अर्ज केला. त्याआधारे तत्काळ शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले.
धनादेशाद्वारे विविध २४ खात्यांमध्ये कर्जाची रक्कम वळती करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. यासंदर्भात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. शिंदे यांनी पोलिस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. मौदा पोलिस स्टेशनमध्ये बोल्ला व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हेशाखेचे पथक या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
image.png