Published On : Tue, Apr 24th, 2018

स्थानिक आर्चबिशपच्या निधनानंतरही महाराष्ट्राच्या ‘हिंदुत्ववादी नागपुरी’ नेत्यांना शोकसंवेदनेचा विसर

नागपूर: शहरातील ख्रिश्चन समुदायासाठी वंदनीय आर्चबिशप अब्राहम वीरूथुकुलंगारा यांचे दिल्ली येथे मागील आठवड्यात गुरुवारी दिल्ली येथे वयाच्या ७४ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. सोमवारी त्यांचा अंत्यविधी संपूर्ण ख्रिश्चन धर्मांतील सर्व विधी-सोपस्कारांसह मोहन नगर येथील एसएफएस चर्च येथे पार पडला. याप्रसंगी ५००० लोकांची उपस्थिती होती. कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही समुदायांचे लोक मोठ्या संख्येने हजर होते.

दोन कार्डिनल, ६० बिशप आणि अनेक पाद्री जगभरातून रेव्हरंड अब्राहम यांना अंतिम निरोप देण्यासाठी आले होते. व्हॅटिकन येथील मुख्य पिठात सुद्धा रेव्हरंड अब्राहम यांची महत्ता पोहोचली होती.

दरम्यान रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेव्हरंड अब्राहम यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे शोकसंदेश याप्रसंगी वाचून दाखवण्यात आले. यामध्ये तामिळनाडूचे राज्यपाल आणि नागपूरचेच मूळ निवासी बनवारीलाल पुरोहित यांच्या संदेशचा देखील समावेश होता. परंतु अत्यंत खेदाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस रेव्हरंड अब्राहम यांच्या अंत्यदर्शनासाठी देखील आले नाहीत तसेच त्यांचा किंवा त्यांच्या सरकारमधील कुणाचाही शोकसंदेश देखील प्राप्त झाला नाही.


शहरात कुणी माजी अधिकारी आणि किंवा शिक्षणतज्ञाचे निदाहण झाल्यास मुख्यमंत्री शोक व्यक्त करतात. नागपूरचे वंदनीय आर्चबिशप अब्राहम यांचे निधन झाल्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. हे तसे धक्कादायकच म्हणावे लागेल.

मुख्य प्रवाहातील भारतीय माध्यमांनी रेव्हरंड अब्राहम यांच्या दुःखद निधनाला प्रामुख्याने प्रसिद्धी दिली. तसेच त्यांच्या कार्य आणि व्यक्तित्वाच्या सन्मानार्थ लेख लिहिले आणि शोकसंवेदना देखील व्यक्त केल्या. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शोक किंवा सांत्वनेचा चकार शब्दही उच्चारला नाही.

यावरून प्रश्न पडतो की, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे काय ? एक ख्रिश्चन आर्चबिशप ज्यांच्या दर्जा एका पिठाच्या शंकराचार्यांएवढा आहे, त्यांच्याप्रती राज्य सरकारने तसेच सौजन्य आणि आदर दाखविणे हे अपेक्षित नाही काय ?

रेव्हरंड अब्राहम दिल्लीच्या कॅथलिक बिशप कॉन्फेरेंस ऑफ इंडिया (सीबीसीआय) सेन्टरमध्ये हिंदी बोलणाऱ्या बिशप्सच्या बैठीकीसाठी गेले होते. तेथे सीबीसीआयच्या मुख्यालयात रात्री झोपेदरम्यान त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते.

रेव्हरंड अब्राहम यांचा जीवनप्रवास
केरळ येथे ५ जून १९४३ रोजी जन्मलेले अब्राहम यांनी १९६० मध्ये आपल्या शालेय जीवन पूर्ण केल्यानंतर इंदूर येथील सेमिनरीत प्रवेश घेतला. वीरुथाकुलंगरा यांना नागपूरच्या सेंट चार्ल्स सेमिनरी येथे १९६९ मध्ये संबंधित धार्मिक शिक्षण घेतल्यानंतर ‘पाद्री’ (याजक) ही पदवी बहाल करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ८ वर्षे गोंड जमातींमध्ये काम केले. त्यांची सेवाभावी वृत्ती आणि साधेपणाची पावती म्हणून त्यांना मध्य प्रदेशच्या खांडवा येथील आदिवासी भागाचे प्रमुख नेमले.

मदर तेरेसांनी आपल्या खांडवा येथील भेटीदरम्यान रेव्हरंड अब्राहम यांना त्यांच्यात दडलेल्या तरुण आणि सुसंवादी बिशपची प्रशंसा केली. त्यांच्या भाष्याप्रावीण्यामुळे अब्राहम यांनी अनेकांपर्यंत पोहोचून त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवता आला.

खांडवा येथे २१ वर्षे सेवा दिल्यानंतर अब्राहम यांना नागपूर महानगराचे आर्चबिशप म्हणून १९९८ साली बढती देण्यात आली. त्यांच्या नागपूर येथील कार्यकाळात स्थानिकांना अनेक आश्चर्यकारक बदल पाहायला मिळाले. मागील ४० वर्षांत एक बिशप आणि आर्चबिशप म्हणून वीरुथाकुलंगारा यांनी १९८६ मध्ये युथ कमिशन ऑफ कॅथॉलिक बिशप्स कॉन्फेरेंस ऑफ इंडियाचे अध्यक्षपद भूषवले. तसेच १९९८ ते २००४ वेस्टर्न बिशप कॉउंसिलचे (ज्यामध्ये गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा समावेश होतो) सुद्धा अध्यक्ष होते.

अशाप्रकारे मानवतेची आणि परमेश्वराची सेवा करणाऱ्या आर्चबिशप अब्राहम यांच्या दुःखद निधनाकडे राज्यपातळीवरील स्थानिक नेत्यांनी मात्र संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. रेव्हरंड अब्राहम यांच्या जाण्यामुळे दुःखी सामान्य जनतेला आणि त्यांचा आदर करणाऱ्या लोकांना या नेत्यांच्या अश्या उद्धट वागणुकीमुळे जरी काही फरक पडलेला नसला तरी या नेत्यांचा करिष्मा आणि तोरा मात्र नक्कीच काहीसा कमी झाला आहे यात शंका नाही.