नागपूर – नागपूर महानगरपालिकेने नागपूर पोलिसांच्या सहकार्याने सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण विरोधी कारवाई करत दुकानदारांना स्पष्ट इशारा दिला आहे की, जर दुकानाबाहेर रस्त्यावर अतिक्रमण केले गेले, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्या मालाची जप्ती केली जाईल. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वतः पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांसोबत सीताबर्डी मेन रोडवर वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
या दरम्यान आयुक्तांनी सीताबर्डीतील मुख्य रस्त्यांसह आंतर रस्त्यांवर व मोदी नंबर 1, 2 आणि 3 या परिसरातही अतिक्रमणविरोधी मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
एप्रिल 2024 मध्ये राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार नागपूर महापालिका व पोलिस विभागाने संयुक्त कारवाईत सीताबर्डी मेन रोडवरील सर्व फेरीवाल्यांना हटवले असून त्यांना महाराजबाग रस्त्यावर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सीताबर्डी मेन रोड अतिक्रमणमुक्त झाला असून आता त्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मनपा आयुक्तांनी वाहतूक विभागाला रस्त्यांवर पार्किंगसाठी आवश्यक संकेतचिन्हे लावण्याचे निर्देश दिले आहेत. अतिक्रमण विभागालाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, दुकानदारांनी रस्त्यावर किंवा दुकानाबाहेर विक्रीसाठी साहित्य ठेवले असल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल. हे पाऊल सीताबर्डी बाजारातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी टाळण्यासाठी उचलण्यात आले आहे.
मनपा आयुक्त व पोलीस उपायुक्तांनी महात्मा गांधी पुतळ्यापासून पारेख ज्वेलर्सपर्यंत पायदळ फेरफटका मारत प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. अतिक्रमण विभागाची टीम आता दररोज दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत सीताबर्डी बाजारात उपस्थित राहणार आहे. तसेच, पोलीस उपायुक्तांनी वाहतूक पोलिसांना नो-पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करून त्यांची जप्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
वाहन पार्किंग व्यवस्था –
हॉकर्स झोनला महाराजबाग येथे हलवल्यानंतर सीताबर्डी मेन रोडच्या दोन्ही बाजूंनी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था –
ग्लोकल मॉलपासून बाटा शोरूम ते नोवेल्टी चौक
बॉम्बेवाला शॉपपासून ड्रीम शॉपपर्यंत
वेंकटेश मार्केटपासून पारेख ज्वेलर्स शॉपपर्यंत
दुचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था –
वैरायटी चौकच्या डाव्या बाजूला
बाला फुटवेअरपासून राजा ऑप्टिकलपर्यंत
सिल्की लाउंज शॉपपासून खादी ग्रामोद्योग शॉपपर्यंत
जोशी आइसक्रीमपासून पारेख ज्वेलर्स जुन्या शॉपपर्यंत
ही व्यवस्था राबवून सीताबर्डी बाजारातील नागरिकांना अधिक सुलभ वाहतूक सुविधा देण्याचा मनपाचा उद्देश आहे.