अमरावती : दिवाळीच्या सणात मिठाईची गोडी काही औरच असते; पण अमरावतीत सध्या एका मिठाईची चर्चा तिच्या चवीपेक्षा तिच्या किमतीमुळे अधिक रंगली आहे. कारण या मिठाईवर चक्क २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्ख चढवण्यात आला आहे. ‘स्वर्ण शंख’ नावाच्या या खास मिठाईचा दर ऐकून ग्राहकांच्या भुवया उंचावत आहेत. एक किलो मिठाईसाठी तब्बल २४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
सोन्याचा थाट असलेल्या या मिठाईमध्ये उच्च प्रतीचे मामरा बदाम, पिसोरी पिस्ता आणि शुद्ध केशराचा वापर करण्यात आला आहे. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा वर्ख चढवून तिला आकर्षक राजेशाही रूप देण्यात आले आहे. राजस्थानमधील कुशल कारागिरांनी आपल्या कलाकौशल्यातून ही खास मिठाई तयार केली आहे.
सामान्य मिठाईच्या तुलनेत कितीतरी पटीने महाग असलेली ही ‘स्वर्ण शंख’ मिठाई सध्या अमरावतीतील मिठाईप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे. दिवाळीच्या बाजारात सोन्याचा भाव गोड पदार्थालाही चढला असून, आता मिठाई खायची की सोन्याचा आस्वाद घ्यायचा, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे!




