Published On : Fri, Nov 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा नागपुरात जुन्या आठवणींना उजाळा; दिलखुलास गप्पांनी रंगली ‘दीपसंध्या’!

Advertisement

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा नागपुरात जुन्या आठवणींना उजाळा; दिलखुलास गप्पांनी रंगली ‘दीपसंध्या’!

नागपूर : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या चित्रपट कारकिर्दीतील आठवणी, जुन्या हिंदी चित्रपटांमागील रंजक किस्से आणि अजरामर गीतांच्या सुरांनी गुरुवारी नागपूरकरांची संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. शिवाजी महाराज कृती समितीतर्फे शिवाजी नगर उद्यानात आयोजित ‘दीपसंध्या’ या सांस्कृतिक सोहळ्यात ‘कुछ यादें कुछ नगमे’ हा विशेष कार्यक्रम रंगला. आशा पारेख यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थिती लावली.

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आशा पारेख यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांच्या बालपणापासून ते हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवासापर्यंतच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. नागपूरशी असलेल्या जुन्या संबंधांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या दोन मावश्या नागपुरात राहत असल्याने बालपणी त्या आठ-नऊ वर्षांच्या असताना अनेकदा नागपूरला येत असत. त्यानंतरही दोनदा नागपूर भेटीचा योग आला. राजेश खन्ना यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रमासाठी आलेली भेट ही नागपुरातील शेवटची असल्याचेही त्यांनी सांगितले.

जुन्या काळातील चित्रपटांचे चित्रीकरण किती आव्हानात्मक होते, याचाही त्यांनी अनुभव कथन केला. त्या काळात रिफ्लेक्टरचा प्रकाश अत्यंत प्रखर असायचा. त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊन गॉगल वापरावा लागत असे. मात्र, गॉगलमुळे आपण मद्यपान केले असल्याचा लोकांचा गैरसमज व्हायचा, असा मजेशीर किस्साही त्यांनी सांगितला.

बालपणी आपण मुलांसोबत खेळणारी आणि मुलांसारखीच वागणारी ‘टॉमबॉय’ स्वभावाची मुलगी असल्याचे त्यांनी सांगितले. शम्मी कपूर यांच्यासोबतचे अनुभव, मालवणी पद्धतीची फिश करी तसेच खाद्यपदार्थांविषयीच्या आवडी यावरही त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Advertisement

आजच्या संगीताबाबत व्यक्त केली खंत-

हिंदी चित्रपटसंगीतातील बदलांवर भाष्य करताना आशा पारेख यांनी आजच्या गाण्यांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रभाव पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याची खंत व्यक्त केली. जुन्या गीतांमध्ये माधुर्याबरोबरच अर्थपूर्णता होती. संगीताची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी संगीत क्षेत्रात योगदान देणारे निरंजन बोबडे यांचे विशेष कौतुक केले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आठवणी सांगताना त्यांनी लतादीदींच्या गायकीतील अवघड आलापांचा उल्लेख केला. ‘लताजी म्हणजे साक्षात सरस्वती होत्या. त्यांचे स्वर आत्मसात करणे सोपे नव्हते,’ अशा शब्दांत त्यांनी आदर व्यक्त केला.

जुन्या गीतांनी कार्यक्रमात भरला रंग

आशा पारेख यांच्या आठवणींना संगीताची सुरेल साथ मिळाल्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात निरंजन बोबडे आणि महेंद्र ढोले यांच्या संगीत संयोजनाखाली ३० कलाकारांच्या चमूने हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या गीतांचे सादरीकरण केले.

मकरंद पाटणकर यांनी ‘श्याम मस्तानी’, मंजिरी वैद्य यांनी ‘रात का समा’, धनश्री देशपांडे यांनी ‘सुनो सजना’, निरंजन बोबडे यांनी ‘तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है’, तर गौरी शिंदे यांनी ‘ओ मेरी सोना रे सोना रे’ हे गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. ‘ये दुनिया वाले पूछेंगे’ यांसारख्या युगलगीतांनीही मैफलीत रंगत आणली.

‘आजा आजा’च्या चित्रीकरणाचा अनुभवही सांगितला-

‘तीसरी मंजिल’ चित्रपटातील ‘आजा आजा’ या लोकप्रिय गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान आलेल्या अडचणींची आठवणही आशा पारेख यांनी सांगितली. शूटिंगच्या दिवशी त्यांना ॲलर्जी झाली होती. दुपारी दोन वाजता चित्रीकरण असल्याने औषधोपचार करूनही त्यांना काम पूर्ण करावे लागले. कलाकाराची तब्येत ठीक नसली किंवा ताप असला तरी अनेकदा चित्रीकरण थांबवता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वीच्या आउटडोअर शूटिंगमध्ये स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव होता. दिवसभर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत असे. आजच्या काळात कलाकारांना व्हॅनिटी व्हॅनसारख्या सुविधा मिळत असल्याचे सांगत त्यांनी जुन्या आणि नव्या चित्रीकरण पद्धतींमधील फरक अधोरेखित केला.

महाराष्ट्रात राहून मराठी बोलता आलीच पाहिजे-

नागपूरकरांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताने भारावलेल्या आशा पारेख यांनी महाराष्ट्राशी असलेले आपले नातेही व्यक्त केले. महाराष्ट्रात जन्म झाला असल्याने मराठी बोलता आलीच पाहिजे, असे त्यांनी मराठीतून सांगितले. राज्याच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचेही त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या आयोजनात शिवाजी महाराज कृती समितीचे अध्यक्ष अजय संचेती, उपाध्यक्ष संगीत चौहान, विनय अग्रवाल, सचिव श्रीकांत देशपांडे, सहसचिव अश्विन राऊत, कोषाध्यक्ष वंदना कुल्हार यांच्यासह समितीच्या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आमदार अभिजीत वंजारी, विलास काळे, ॲड. आनंद परचुरे, रवींद्र कासखेडीकर, संजय पेंडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.