Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, May 19th, 2018

  पाणी व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा करा : कुकरेजा

  Virendra Kukreja
  नागपूर: नागपुरात पाच लाख ३२ हजार मालमत्ता आहेत. त्यानुसार पाणी कनेक्शनही याच तुलनेत असायला हवे. कर विभागासोबत जलप्रदाय विभागाने समन्वय साधून तातडीने नवीन कनेक्शन द्यावे, ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक लावावे, चोरी गेलेल्या मीटरबाबत एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा आणि नव्याने मीटर द्यावे आणि चालू आर्थिक वर्षात पाणी बिल वसुलीपोटी ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

  डीआरए नामक कन्सल्टन्सीने सादर केलेला प्रकल्प राबविण्याचे कार्य ओसीडब्ल्यू करीत आहे. मात्र डीआरएच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत स्थायी समिती सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भातही एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा, असेही निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले.

  नागपूर शहरात होणारा पाणीपुरवठा, नागरिकांच्या तक्रारी, थकीत बिलाची वसुली, अवैध नळ कनेक्शनचे नियमितीकरण, अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती आदी विषयांवर सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात विशेष बैठक पार पडली. बैठकीला मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नगरसेवक सुनील हिरणवार, मनोज सांगोळे, शेषराव गोतमारे, जुल्फेकार भुट्टो, राजेश मानकर, नगरसेविका सोनाली कडू, मंगला खेकरे, अर्चना पाठक, विद्या कन्हेरे, मनिषा अतकरे, अभिरुची राजगिरे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, लेखाधिकारी शिंदे, ओसीडब्ल्यूचे सर्वश्री मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, उपसंचालक (ग्राहक सेवा) राहुल कुलकर्णी, उपसंचालक राजेश कालरा उपस्थित होते.

  सध्या नागपुरात तीन लाख ३० हजार एकूण नळ कनेक्शन असून त्यापैकी दोन लाख ४० हजार ग्राहकांच्या मीटरची रीडींग घेण्यात येते. ५३ हजार ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात येते तर २२ हजार ग्राहकांना फ्लॅट बिल पाठविण्यात येते. थकबाकीदारांमध्ये ५० हजार ते एक लाख थकबाकी असलेले २२७६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एक लाखांवरील थकबाकीदार ७९३ आहेत. पाच हजारांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या एक लाख २४ हजार आहे. एक लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या २२७६ पैकी १८०० ग्राहकांची नळ जोडणी कापली असून अन्य ग्राहकांना नोटीस देण्यात आले असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  ज्या ग्राहकांचे मीटर चोरीला गेले आहे, अशा ग्राहकांकडे पुढील १५ दिवसांत मीटर लागायला हवे. यासाठी ग्राहकांना प्रथम नोटीस देण्यात यावी. १५ दिवसांत ग्राहकांनी मीटर बदलवावे, अन्यथा मनपा ते मीटर बदलवेल. मीटरची किमत सहा महिन्यांत बिलामधून टप्प्याटप्प्याने वसूल केली जाईल, असे निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले. यावर झालेल्या चर्चेनंतर ग्राहकांनी ५० टक्के रक्कम द्यावी, ५० टक्के रक्कम ओसीडब्ल्यूने भरावी, अशी सूचना काही सदस्यांनी दिली. चर्चेअंती हा विषय निर्णय घेण्यासाठी एनईएसएलकडे पाठविण्याचे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. जुन्या बिलाच्या तडजोडीचा निर्णय घेण्याचा विषयही एनईएसएलकडे वर्ग करण्यात आला. अनेक पाणी पुरवठा पाईपलाईनवर सीमेंट रस्ते तयार झाले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण स्वत: लक्ष घालू, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.

  पुढील बैठकीपासून ओसीडब्ल्यूने वसुलीचे महिनानिहाय विवरण सादर करावे, असेही निर्देश स्थायी समिती सभापती कुकरेजा यांनी दिले. बैठकीला ओसीडब्ल्यूचे डेलिगेटस्‌ व अन्य संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145