Published On : Sat, May 19th, 2018

रेल्वे ई-तिकीटांचा काळाबाजार

Nagpur Railway station

नागपूर: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बनावट आयडीव्दारे रेल्वे ई-तिकीटांची खरेदी आणि काळाबाजार करणाºया ट्रॅव्हल्स संचालकाच्या आरपीएफने मुसक्या आवळल्या. शुक्रवारी सकाळी नाट्यमयरीत्या धाड घालुन कार्यालयाची झाडाझडती घेतली. यावेळी ६१ प्रवाशांच्या ३२ ई तिकीट, ३ संगणक, एक लॅपटॉप, ३ डोंगल, एक वायरलेस राऊंडर आणि २ पेनड्राईव्ह असा एकून ९२ हजार २३९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ट्रॅव्हल्स संचालकाला अटक केली. अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांनी पत्रपरिषदेत दिली.

मनिष भार्गव (५०, रा. पार्कव्यु अपार्टमेंट, किंग्सवे) असे अटकेतील ट्रॅव्हल्स संचालकाचे नाव आहे. शोभना ट्रॅव्हल्स या नावाने त्याचे मेयो रुग्णालया जवळ कार्यालय आहे. विशेष म्हणजे तो आयआरसीटीसीचा अधिकृत एजंट आहे. त्यामुळे त्याला आयआरसीटीसी कडून अधिकृत आयडी मिळाली आहे. परंतु अधिकृत आयडीवर फार तिकीटा घेता येत नाही. तसेच अधिकृत एजंटला नियमानुसार एका तिकीटावर विशिष्ट रक्कम मिळते. मात्र, कमी वेळात अधिक पैसे कमविण्याच्या लालसेपोटे मनिषने पर्सनल ८० आयडी (बनावट) तयार केल्या. त्याआधारावर तो क्षणात गरजु प्रवाशांना कन्फर्म तिकीट द्यायचा. मग गरजेनुसार प्रवाशांकडून पैसे घेत असे. वास्तविक अधिकृत एजंट घेतलेल्या पैशाची पावती देतो मात्र, भार्गव अशी कोणतीच पावती देत नव्हता असेही सतिजा यांनी सांगितले.

उन्हाळ्याच्या सुट्यात अनेकांनी बाहेरगावी जाण्याचा बेत आखल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक गाड्यांत प्रतिक्षा यादी वाढत चालली आहे. प्रत्येकालाच कन्फर्म बर्थ हवी आहे. यासंधीचा फायदा घेत मनिष आधुनिक तंत्राचा वापर करुन रेल्वे ई- तिकीटांची काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांना मिळाली. त्याआधारावर शुक्रवारी त्यांनी उपरोक्त कार्यालयात धाड घालण्याची योजना आखली. मात्र, या प्रकरणाविषयी अंत्यत गुप्तता बाळगत शेवटच्या क्षणी सहकाºयांना सांगितले. यासाठी गणेशपेठ पोलिसांचीही मदत घेतली.

कार्यालयात धाड घातल्यानंतर संगणकाची तपासणी केली. यावेळी ६१ प्रवाशांच्या ३२ ई तिकीट मिळून आल्या. यावेळी मनिषने रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करीत असल्याची कबूली दिल्याचेही सतिजा यांनी सांगितले. उपरोक्त कारवाईत निरीक्षक ए.सी. सिन्हा, उपनिरीक्षक होतीलाल मीणा, राजेश औतकर, के.एन. राय, प्रधान आरक्षक राकेश करवाडे, जगदीश सोनी, अश्विन पवार, अमित बारापात्रे आणि आरक्षक विवेक कनोजिया यांचा समावेश होता. पत्रपरिषदेला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे उपस्थित होते.