Published On : Sat, Oct 24th, 2020

खात्रीशीर पाणीपुरवठा: लाखो शहरी गरीब नागरिकांच्या आयुष्यांत दररोज सुधारणा

Advertisement

पाण्याची उपलब्धता आणि पाणी मिळवण्याची सुलभ संधी या आपल्या आयुष्यासाठी अत्यावश्यक बाबी आहेत. मोठ्या इमारती किंवा पाणी साठा करण्याची पुरेशी सुविधा असलेल्या सुखवस्तू घरांमध्ये राहणारे नागरिक महानगरपालिकेकडून होणाऱ्या पुरवठ्यावर प्रत्यक्षपणे अवलंबून नसतात. मात्र, गरीब वस्त्यांमधील नागरिक पूर्णपणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असतात. स्वच्छ आणि सतत पुरेसे पाणी मिळवण्याबाबतची असुरक्षितता आणि मर्यादित संधी यांचा या नागरिकांच्या आयुष्यावर दररोज मोठा परिणाम होत असतो.

झोपडपट्टीतील बहुतांश घरांमध्ये पाण्याच्या अनिश्चिततेमुळे कुटुंबासाठी पाण्याची सोय करण्यासाठी किमान एका सदस्याला रोजी कमावण्यास मुकावे लागते. या घरांना आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी एकतर सार्वजनिक नळांवरील अनियमित पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते किंवा दूरवरून पाणी आणावे लागते अन्यथा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर तरी विसंबून राहावे लागते. अशा स्रोतांपासून मिळवलेल्या पाण्याच्या गुणवत्तेची हमी नसते. याचा पुरावा म्हणजे नेहमी होणारे विशेषकरून लहान मुलांमध्ये आढळणारे जलजन्य आजार.

मात्र २४x७ पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अमलबजावणीमुळे ही आव्हाने नागपूर शहरासाठी इतिहासजमा होत आहेत. या योजनेचे एक महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे शहरी गरीब वस्त्यांमधील नागरिकांना घरबसल्या पाणी मिळवण्याची संधी देणे हे होय.

२४x७ प्रकल्पांतर्गत प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोडणी देण्यात येत आहे. ज्यामुळे सुरक्षित, मुबलक आणि उत्तम गुणवत्तेचा खात्रीशीर पुरवठा सवलतीच्या दरात गरीब वस्त्यांमधील प्रत्येक घराला होत आहे. यातून सर्वांना पाणी मिळवण्याची समान संधी प्राप्त होत आहे. तसेच गुणवत्ता राखल्या गेल्याने जलजन्य आजारांचे प्रमाणदेखील कमी होण्यात मदत होत आहे. गरीब वस्त्यांमधील नागरिकांसाठी हा आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे.

रामबाग वस्तीतील प्रकाश नागदेवे सांगतात, “खात्रीशीर पाणीपुरवठ्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्व वयस्क सदस्य बाहेर पडून काम करू शकतात. यामुळे माझ्या कौटुंबिक मिळकतीत वाढ झाली आहे. तसेच वैद्यकीय खर्चदेखील कमी झाला आहे. घरातील मुले आता पाण्याची चिंता करण्याऐवजी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात आणि पाण्यासाठी त्यांच्यावर शाळा बुडविण्याचीही वेळ येत नाही.” पाण्याच्या देयकाविषयी चौकशी केली असता ते म्हणाले, “सुधारित पाणीपुरवठ्यामुळे झालेले जे फायदे मी सांगितले, त्याबदल्यात पाण्याचे देयक भरणे ही माझ्यासाठी कुठलीही समस्या नाही. त्यात मनपाने आम्हाला पाणीदरात सवलतदेखील दिली आहे.”

जलप्रदाय समिती अध्यक्ष श्री विजय झलके यांनी सांगितले, “२४x७ प्रकल्पाची बांधणी झोपडपट्टीवासी बांधवांचा विचार करूनच करण्यात आली होती. झोपडपट्टीतील प्रत्येक घराला खात्रीशीर नियमित वेळांत पाणीपुरवठा करण्यास आम्ही बांधील आहोत. यातून त्यांच्या आयुष्यांवर सकारात्मक प्रभाव पडलेला आहे आणि पुढेही पडत राहील.”

नागरिक तसेच पदाधिकाऱ्यांकडून मिळणारी ही पावती २४x७ प्रकल्पाने नागरिकांच्या आयुष्यात घडवून सकारात्मक बदल घडवून आणल्याचे आणि पाणी मिळवण्याची संधी ही मुलभूत गरज या प्रकल्पाने पूर्ण केल्याचेच सिद्ध करते.