
नागपूर : जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील 250 शाळांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जीर्ण इमारती, खराब स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि अपुऱ्या मूलभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन संजीवनी’च्या माध्यमातून या शाळांचा कायापालट करण्याचे नियोजन आहे.
कॉक्रोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेत नागपूर जिल्ह्यातील 1,509 जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीदरम्यान काही शाळांमधील असुविधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषद प्रशासनाने 250 शाळांच्या दुरुस्तीची प्रक्रिया हाती घेतली आहे.
‘मिशन संजीवनी’साठी गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पूर्ण करून नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे. शाळांच्या रंगरंगोटीपासून किरकोळ दुरुस्ती आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणांपर्यंतची कामे केली जाणार आहेत.
नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय होमग्राउंड मानले जाते. त्यामुळे शाळांच्या प्रश्नावर सुरू झालेल्या मोहिमेनंतर 250 शाळांच्या नूतनीकरणाला मिळालेला वेग चर्चेचा विषय ठरत आहे. ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेचा परिणाम म्हणून प्रशासनाने पावले उचलली की ही प्रक्रिया आधीपासूनच नियोजित होती, यावर आता चर्चा रंगली आहे.




