Published On : Sat, Dec 2nd, 2017

थकीत वसुली त्वरित करा : महापौर नंदा जिचकार


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांचा आढावा महापौरांद्वारे घेणे सध्या सुरू आहे. शनिवारी (ता.२) महापौर नंदा जिचकार यांनी बाजार विभागाचा आढावा मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना महापौर म्हणाल्या, महापालिकेच्या बाजारच्या माध्यमातून करण्यात येणारी जी वसुली थकीत आहे ती तातडीने करा, असे निर्देश दिले. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी बकाया रक्कग लवकरात लवकर वसूल करण्यात यावी, असेही महापौर म्हणाल्या.

यानंतर महापौरांनी कर वसुली संदर्भातील आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. करप्रणालीतील अडथळे दूर करून त्यात सुधारणा करण्यात याव्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

हॉकर्स संदर्भात महापौरांनी यावेळी आढावा घेतला. शहरात लवकर हॉकर्स झोन तयार करण्यात यावे, सर्वेक्षण करून जागा शोधण्यात याव्यात, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. रिंग रोड, हायवेवरील हॉकर्स हटवून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी सूचनादेखिल केली. कामातील सर्व त्रुटी दूर करण्याचे निर्देशित केले. हॉकर्सचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशी सूचना केली. शहरातील पार्किंगसंदर्भातही मनपा लवकरच धोरण ठरवेल, असेही त्या बोलताना म्हणाल्या.


बैठकीला सहायक अधीक्षक नंदकिशोर भोवते, निरिक्षक रोडके यांच्यासह बाजार विभागाचे कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.