Published On : Sat, Dec 2nd, 2017

सोमवारपासून ग्रंथोत्सव: ग्रंथप्रेमी, वाचकांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Sachin Kurve
नागपूर: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनाल तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने नागपूर ग्रंथोत्सव-2017 हा ग्रंथ सोहळा सोमवार दिनांक 4 डिसेंबरपासून डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले असून या ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

नागपूर ग्रंथोत्सव-2017 सोमवार दिनांक 4 व मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून सोमवारी सकाळी 9 वाजता जी.एस. कार्मस कॉलेजच्या प्रारंगणातून ग्रंथ दिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात होणार आहे. ग्रंथ दिंडीचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार नागो गाणार, प्रा. डॉ. एन.वाय. खंडाईत, शिक्षणाधिकारी एस.एन.पटवे उपस्थित राहणार आहे.

ग्रंथोत्सव व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक श्रीमती आशा बगे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, डॉ. रविंद्र शोभणे, ग्रंथपाल श्रीमती वि. भू डांगे, सहायक संचालक श्रीमती मि. रा. कांबळे आदी राहतील. दुपारी 2.30 वाजता प्रभावी वाचन माध्यमे यावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5 वाजता कवियत्री रेश्मा कारखानिस यांच्या लेखनितून साकारलेल्या कविता, गीत, गजलांचा संगीतमय कार्यक्रम, शब्दांचा सुरेल प्रवास सादर होणार आहे. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार गिरीष व्यास व विभागीय आयुक्त अनूप कुमार उपस्थित राहणार आहेत.

मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी ग्रंथाने काय दिले यावर परिसंवाद होणार आहे. तसेच सायंकाळी 4.30 वाजता नव्या व जुन्या कवितांचा सांगितीक प्रवास सचिन ढोमणे आणि कलाकार सादर करणार आहे. सुत्र संचालन रेणुका देशकर यांचे असून प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व ज्येष्ठ पत्रकार वामन तेलंग राहणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता आमदार परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार असून ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, जिल्हा‍ माहिती अधिकारी अनिल गडेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.