गिट्टीखदान शाळेचा आकस्मिक पाहणी दौरा : शाळा निरिक्षकावर कारवाई करण्याचे निर्देश
नागपूर: बेजबाबदार शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याचे व सबंधित शाळा निरिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले. महापौर संदीप जोशी यांच्या सूचनेनुसार उपमहापौर मनीषा कोठे आणि शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी सोमवारी गिट्टीखदान शाळेला आकस्मिक भेट दिली.
उपमहापौर व शिक्षण समिती सभापतीच्या भेटीत मनपा शाळेतील शिक्षक वर्गावर न राहता बाहेरील परिसरात गप्पा मारत असल्याचे निर्देशनास आले. या सर्व प्रकार बघीतल्यानंतर उपमहापौर मनीषा कोठे व शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी संताप व्यक्त करत शिक्षकांना खडेबोल सुनावले. शिक्षकांना जबाबदारी कळत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित शिक्षकांना केला. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर बेजबाबदार शिक्षकांना तात्काळ निलंबित करा, असे निर्देश उपमहापौरांनी दिले.
यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांची हजेरी तपासली. हजेरीमध्ये अनुपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी लावतांना आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शाळा निरिक्षकांच्या पुस्तकात विद्यार्थ्यांची संख्या चुकीची नमुद केल्याचे निर्देशनास आले. गिट्टीखदान शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ४३ विद्यार्थी असून शाळा निरिक्षकांच्या नोंदणी पुस्तकात ३३ विद्यार्थी हजर दाखविण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात शाळेमध्ये 15 विद्यार्थी हजर असल्याचे दिसून आले. हा धक्कादायक प्रकार असून यात विशेष लक्ष घालून शाळा निरिक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.
शाळेतील विद्यार्थ्यांचे पुस्तक, वह्या, पेपर, व्यवसायमाला ही तपासल्या. यामध्ये देखीलही गोंधळ आढळून दिसून आल्याचे निर्देशनास आले. विद्यार्थ्यांची उजळणी अभ्यास यावेळी मान्यवरांनी घेतला.
यापुढे कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, अशा इशारा उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिला. शिक्षकांची उजळणी घेतली. शिक्षकांना मान्यवरांनी भारताचे उपराष्ट्रपती कोण? असा सवाल विचारला असता, श्रीमती रेवती कडू, शारदा खंडाळे, ललिता गावंडे या शिक्षकांना याचे उत्तर देता आले नाही. हा प्रकार गंभीर असून याकडे शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश उपमहापौरांनी दिले.
याशिवाय प्रथम सत्राचा निकाल न बनवणे, पालकसभा न घेणे, मुल्यमापन पत्रक तयार नाही, अशा गंभीर बाब दिसून आल्यात. यावर सर्व मान्यवरांनी नाराजी व्यक्त करत पुढील आठवड्यात सर्व स्थिती सुधारली नाही तर निलबंनाची कारवाई अटळच आहे, असा गंभीर इशाराही उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिला.
