
रामबाग परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार आपल्या बहिणीच्या घरी जात असताना चार जणांनी त्याचा पाठलाग केला. रस्त्यात अडवत आरोपींनी चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्या खिशातील १ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
घाबरलेला तक्रारदार कसाबसा बहिणीच्या घरी पोहोचला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग सोडला नाही. काही वेळातच ते घराजवळ पोहोचले आणि दरवाजा ठोठावत ५ हजार रुपये देण्याची मागणी करू लागले. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्यांनी दिली. यावेळी आरोपींनी खिडकीजवळ ठेवलेले ड्रेसिंग टेबल खाली पाडून घरातही गोंधळ घातला.
बहिण गावावरून परतल्यानंतर तक्रारदाराने संपूर्ण प्रकार तिच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपींची ओळख पटवली.
तपासादरम्यान पोलिसांनी रितिक विक्की खोब्रागडे (रामबाग) याला अटक केली. त्याचे तीन साथीदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या रितिकविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत.



