नागपूर : मौदा पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री 11.20 वाजण्याच्या सुमारास महदुला येथे कारवाई करून रॉयल्टीशिवाय वाळू उत्खनन प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी वाळू ने भरलेल्या दोन ट्रॅक्टरसह एकूण 12 लाख 10 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
महदुला येथील नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या मौदा पोलिसांच्या पथकाला मिळाली. पथकाने घटनास्थळ गाठून नदीपात्रात क्रमांक नसलेले दोन ट्रॅक्टर पाहिले. त्या दोन्ही ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली होती. पथकाने तातडीने वाळूची पाहणी केली. तपासणीअंती ही वाळू सांड नदीपात्रातील वाळू असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी आरोपींकडून दोन्ही ट्रॅक्टर, ट्रॉली व त्यात भरलेली वाळू जप्त केली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी ट्रॅक्टरचालक महादुला रहिवासी अक्षय सुधाकर ठोंबरे आणि जितेंद्र धनराज बावनकुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 12 लाख 10 हजार रुपयांची वाळू, ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्रॅक्टर मालकांपैकी एकाचा राजकारणाशी संबंध असून तो राजकारणाच्या मदतीने अवैध वाळू उत्खननाचे काम करत असल्याची चर्चा आहे.