
नागपूर : कामठी परिसरात दगडी कोळशाची चोरी करून त्याची अवैध खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेच्या भू-माफिया विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, तब्बल ११ हजार ६२५ किलो दगडी कोळसा जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी रेल्वे क्रॉसिंगवरून गादा गावामार्गे आवंडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गादा शिवारात असलेल्या रहमत एक्झीन फर्ममध्ये कोळशाची अवैध खरेदी-विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने पहाटे सुमारे ४ वाजता पंचांच्या उपस्थितीत फर्मवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आहाद फिरोज अहमद, दानिश मोहम्मद अकरम, चेतन रमेश शेंद्रे, कुणाल हरीश राऊत आणि अतुलसिंग अभिमन्युसिंग यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चेतन, कुणाल आणि अतुलसिंग हे कथितरित्या कन्हान खाणीतून कोळसा चोरी करून तो दानिशच्या फर्ममध्ये विक्रीसाठी आणत होते. त्यानंतर कोळशाची अवैध खरेदी-विक्री करून आर्थिक फायदा मिळवला जात असल्याचा संशय आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून ११,६२५ किलो कोळसा, १०,५०० रुपये रोख, वजनकाटा, चार दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.




