
नागपूर : एखाद्या पुरुषाच्या यशामागे त्याच्या पत्नीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. माजी विधान परिषद सदस्य अनिल सोले यांच्या ६७व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
“बायको जर ठीक नसेल तर माणूस कितीही कर्तृत्ववान असो, तो राजकारणात, समाजकारणात किंवा व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही,” असे गडकरी म्हणाले. सामाजिक आणि राजकीय जीवन जगताना कुटुंबीयांना अनेकदा मोठा त्याग आणि त्रास सहन करावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी गडकरी यांनी आपल्या वैवाहिक जीवनातील एक आठवणही सांगितली. “माझे लग्न झाले त्यावेळी माझ्याकडे शंभर-दीडशे कप चहा व्हायचा. त्यावर माझ्या बायकोने मला विचारले, मला बायको म्हणून आणले की मोलकरीण म्हणून?” असा किस्सा त्यांनी सांगितला.
मुलांवर चांगले संस्कार होण्यामागेही पत्नीचे मोठे योगदान असल्याचे गडकरी यांनी सांगितले. “मी काहीच पाहत नाही, मात्र त्यांनी पाहिले नसते तर चिंधड्याच झाल्या असत्या,” असे ते म्हणाले. सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात व्यक्तीच्या यशामागे कुटुंबातील, विशेषतः पत्नीच्या योगदानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.




