नागपूर: तहसील पोलीस ठाणे आणि झोन-३ पथकाने मिळून मोठी कारवाई करत अवैध शस्त्रसाठा उघड केला आहे. या धाडीत पोलिसांनी दोन आरोपींना पकडत त्यांच्याकडून देशी पिस्तूल, दोन मॅग्झिन, आठ जिवंत काडतुसे आणि मोपेड मिळून तब्बल १ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई तीन नल चौक ते इंदोरा मैदान सिटी बस स्टॉप परिसरात करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या मोपेडच्या डिकीतून पिस्तूल व काडतुसे आढळून आली.
अटक आरोपी –
१) ईशान गोविंद चंद्र जसनानी (३६), रा. कमल पूल चौक, जरीपटका, नागपूर
२) इमरान खान मोहम्मद कादिर खान (२५), रा. गरीब नवाज चौक, खरबी, नागपूर
जप्त मालमत्ता –
- देशी बनावटीचे पिस्तूल व मॅग्झिन – अंदाजे किंमत ₹८०,०००
- अतिरिक्त मॅग्झिन – ₹५,०००
- आठ जिवंत काडतुसे – ₹१६,०००
- मोपेड (MH-31-ET-4015) – ₹४०,०००
असा एकूण १.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे नागपूर पोलिसांचे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न अधोरेखित झाले असून स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.