Published On : Tue, Jun 19th, 2018

आयआयटी बॉम्बेमध्ये सीनिअरकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ

मुंबई :आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या एका सीनिअर विद्यार्थ्यावर लैंगिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यावरील अन्यायाची माहिती दिली .फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवर विद्यार्थ्यांनी आपल्याला सामोरं जावं लागलेल्या परिस्थितीसंबंधी सांगितले .

आरोपी विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी तसंच ‘मूड इंडिगो’ या फेस्टिव्हलमध्ये मेंटॉर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाई होत असल्याने विद्यार्थ्यांनी अखेर सोशल मीडियाची मदत घेतली आहे. कारवाई झाली नाही तर पदवीदान संमारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा काही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आयआयटीचे डीन सौम्य मुखर्जी यांनी त्याची नियुक्ती केली होती. मेंटॉर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, जिथे पहिल्यांदा तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याची आणि त्याची भेट झाली होती.

तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्याप्रमाणे अन्य १५ जणांचाही गेल्या सहा ते सात महिन्यांपासून लैंगिक छळ सुरु असल्याचं म्हटलं आहे. हा आकडा अजून मोठा असण्याची शक्यताही त्याने व्यक्त केली आहे. शिस्तपालन समितीकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. पण परिस्थितीजन्य पुरावे आरोपी विद्यार्थ्याचं निलंबन करण्यासाठी पुरेसे नव्हते, असं व्यवस्थापनाने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.