Published On : Thu, Jun 11th, 2020

शासनाचे नियम पाळा नाही तर नागपुरात होईल कोव्हिडचा उद्रेक मनपा आयुक्तांचा इशारा

नागपूर : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार नागपूर शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या शिथिलतेसह कोव्हिड-१९ संसर्गाचा धोकाही अधिक वाढला आहे. शासनाच्या दिशानिर्देशांची कडक अंमलबजावणी नागरिकांनी केली नाहीतर नागपुरात कोव्हिड-१९ चा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त करतानाच नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागरिकांतर्फे कोव्हिड-१९ च्या गाईडलाईनचे पालन न करणे, खबरदारी न घेणे, बेजबाबदारपणाचे वर्तन करणे यामुळे कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ, स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे नव्हे. चार चाकी वाहनात वन प्लस टू आणि दुचाकीवर केवळ एक व्यक्ती अनुज्ञेय असताना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, आवश्यकता नसतानाही घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा वागण्यामुळे नागपुरात कोव्हिड-१९ संसर्गाचा गुणाकार होण्यास सुरुवात झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. हे शहर आपले आहे. या शहराला सुरक्षित ठेवायचे असेल तर नागरिकांनी नियम पाळायलाच हवे.


नियमांचे उल्लंघन करून फौजदारी कारवाई करण्यास नागरिकांनी बाध्य करू नये. हे शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीच आहे. खबरदारी घ्या, प्रशासनाला साथ द्या, जबाबदारी दोघेही घेऊ आणि कोरोनाची साखळी खंडीत करू, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. असे केले नाहीतर, नागपुरात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण वाढतील. मृत्यसंख्याही वाढेल. हे आपण सर्वांनी एकत्रित नियमांचे पालन केले तर टाळता येईल. नागपूर कोरोनामुक्त करता येईल, असेही मनपा आयुक्तांनी म्हटले आहे.