Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Mar 28th, 2020

  होम क्वारंटाईनमधील लोकांनी बाहेर फिरल्यास आता सक्तीने शासकिय दवाखान्यात क्वारंटाईन : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

  वडसा येथील १० व्यक्तींना सक्तीने दवाखान्यात हलविले

  गडचिरोली : हातावर शिक्के मारलेल्या जिल्हयातील घरीच क्वारंटाईन केलेल्या सहा हजार लोकांनी बाहेर फिरल्यास त्यांना प्रशासनाकडून सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आरोग्य व पोलीस प्रशासनाला दिल्या. प्रशासनाकडून याबाबत सार्वत्रिक स्वरूपात याआगोदर घरात राहण्याच्या सूचना संबंधितांना देणेत आल्या होत्या.

  याच धर्तीवर वडसा येथील १० होम क्वारंटाईन केलेल्या लोकांनी बाहेर फिरल्याने शासकीय क्वारंटाईन वार्डात ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात कोरोना विषाणू संसर्ग संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संचार बंदी व साथरोग नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कठोर स्वरूपात करण्यात येत आहे. आज जिल्हयातील सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांची तातडीने बैठक घेवून जिल्हाधिकारी यांनी संचार बंदी दरम्यान येत असलेल्या अडचणी व उपाययोजनांवर चर्चा केली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड व सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

  लोकांचा बाहेरील अकारण संचार बंद करणे, जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करणे, आरोग्य सुविधांची निर्मिती करणे, पोलीस प्रशासनाचे कार्य, होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर नजर ठेवणे आदी विषयावर यावेळी नियोजन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाकडून आलेल्या सूचनांनूसार जिल्हयात बाहेरून कोणालाही येण्यास व जिल्हयातून बाहेर जाण्यास बंदी घातल्याने जिल्हयातील कामगार व इतर लोकांना आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरविण्याबाबतही चर्चा झाली. *या बैठकीत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी पुढील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत –*

  •कोरोना बाधित प्रदेशातून आलेल्या व्यक्तींसाठी* : अशा व्यक्तींनी स्वत:हून आपली नोंदणी प्रशासनाकडे करा. त्यांनी घरीच रहा. बाहेर आल्यास सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईन.

  •किराणा व भाजीपाला दर* : सर्व किराणा दुकानदार, शेतकरी व भाजीपाला व्यापारी यांनी किराणा व भाजीपाला हे जीवनावश्यक बाबीत येत असल्याने लोकांना वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. याबाबत वाहतूक व विक्रीमध्ये काही अडचण असल्यास प्रशासनाला कळवा. कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक दरवाढ करून कोरोना आपत्तीची संधी साधून दरवाढ करू नका. बाजार मुल्या नूसार दर ठेवून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन करण्यात आले आहे.

  •परजिल्हा व परराज्यातील कामगार लोकांबाबत* : संचार बंदीमुळे एका जिल्हयातून दुस-या जिल्हयात जाता येत नसल्यामुळे तसेच जिल्हयातील बेघर व गरजू लोकांसाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या लोकांनी घाबरून न जाता ज्या गावात असाल तिथेच थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशा लोकांची माहिती प्रशासनाला नागरिकांनी कळवावी म्हणजे त्यांना आवश्यक मदत करता येइल.

  •कोराना बाबत मदतीबाबतचे आवाहन* : सद्या मोठया प्रमाणात लोकांकडून विविध साहित्य व पैसे गरजूंना मदत करण्यासाठी जमा करण्याचे सुरू आहे. यामध्ये प्रशासनाशिवाय कोणीही अर्थिक मदत जमा करू शकत नाही. नागरीकांनीही प्रशासनाकडेच असा निधी जमा करावा. जर खाजगी व्यक्ती किंवा संस्था लोकांकडून पैसे जमा करत असतील ते कायदेशीर नाही. पोलीस अशा व्यक्तींवर कारवाई करतील. लोकांनीही अशा ठिकाणी अर्थिक मदत करू नये. जर मदत करावयाची असेल तर साहित्य स्वरूपात किराणा पॅकेट, मास्क, सॅनिटायझर या वस्तू प्रशासनाच्या मदतीने व्यक्ती किंवा संस्था वाटप करू शकते. यावेळी साहित्य हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे पॅकिंग केलेले व हाताळलेले असावे. जर पैसे द्यावयाचे असतील तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये किंवा जिल्हाधिकारी यांचे नावे पाठवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

  •जिल्हयातील विविध मदत कक्ष व संपर्क क्रमांक :*

  1)आरोग्य विषयक माहिती व संपर्क – जिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली दुरध्वनी क्र.०७१३२ २२२३४०

  2)संचार बंदी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तसेच इतर सर्वच अनुषंगिक माहिती – पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष गडचिरोली क्र. ०७१३२ २२३१४९, २२३२४२ व्हॉटस ॲप क्रमांक – ९४०५८४८७६७, ९४०५८४८७३७, ९४०५८४९१९७.

  3)जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष गडचिरोली -०७१३२ २२२०३१

  यातील कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी आलेल्या अडचणींची नोंद करा


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145