Published On : Sat, Mar 28th, 2020

घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

Advertisement

नागपूर * नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहे. लोकांमध्ये ते गेले नाही आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

नागपुरात पूर्वी जे चार व्यक्ती कोरोनाबाधित होते त्यांच्यापैकी एक रुग्ण पूर्णत: बरा झाला असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. अन्य तीन रुग्णही बरे होत असून पुढील काही दिवसांत त्यांनाही घरी पाठविण्यात येईल. हे चारही रुग्ण परदेशातून आलेले होते. नव्याने जे पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यांच्यातील एक व्यक्ती आपल्या व्यवस्थापकासह दिल्लीला गेला होता. तेथून आल्यानंतर घरातील काहींच्या संपर्कात ते आले. त्या सर्वांची तपासणी करण्यात आली असून जे-जे पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.

मनपाची चमू आता पुन्हा एकदा लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या कोअर एरियामध्ये सर्व्हेक्षण करत आहे. पुढील १४ दिवसांपर्यंत मनपाच्या १८५ चमू २७४६३ घरात राहणाऱ्या एक लाख लोकांचे सर्वेक्षण करणार आहे. सध्या आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरापासून एक कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील ही घरे आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती आढळतील त्यांच्यावर मनपाच्या आरोग्य विभागाची चमू लक्ष ठेवेल. असाच सर्व्हे आता संपूर्ण शहरातही सुरू असून सुमारे ४९५ चमू यासाठी कार्यरत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.