नागपूर : इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्यावरून वाद पेटले असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर गडकरींनी मौन तोडले.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “मी आजवर एकाही कंत्राटदाराकडून एक रुपयाही घेतलेला नाही. म्हणूनच कंत्राटदार मला घाबरतात.”
इथेनॉलवर चालणारी गाडी उदाहरण म्हणून पुढे-
गडकरी पुढे म्हणाले, “मी जी इनोव्हा कार वापरतो, ती शंभर टक्के इथेनॉलवर चालते. धान्य, मका, ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार होतं. यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा झाला, प्रदूषणही कमी झालं. पण, याआधी २२ लाख कोटी रुपयांचे इंधन आयातीवर खर्च होत होते. त्यामुळे ज्या लोकांचा धंदा बंद पडला ते माझ्यावर रागावणारच.”
“पेड न्यूज सुरू झाल्या, पण…
गडकरी म्हणाले, “ते नाराज झाले, म्हणून त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या. पण मला काही चिंता नाही. जनतेचं प्रेम माझ्यासोबत आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी कधीही खोटी कामे केली नाहीत. कितीही आरोप झाले तरी मी डगमगत नाही आणि तुम्हीही विचलित होऊ नका.”
राजकारणात इर्षा आणि मत्सर वाढला-
गडकरींनी स्पष्ट केलं, “आजच्या राजकारणात आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसून टाकली तर आपली मोठी होईल अशी मानसिकता तयार झाली आहे. हेच आरोप-प्रत्यारोप त्याचे उदाहरण आहे. मी याआधीही अशा संकटांना सामोरे गेलो आहे आणि लोकांनी कधीही खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही.”
जनतेचं प्रेम हीच खरी ताकद-
शेवटी गडकरी म्हणाले, माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त करता, ते माझ्यासाठी मौल्यवान आहे. जनतेच्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली खरी पुंजी आहे.