नागपूर: राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि इतर अनेक भाग गंभीर प्रभावित झाले आहेत. गेल्या पन्नास वर्षांत इतके नुकसान झालं नव्हते, तितकं नुकसान या पावसामुळे झाले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचवण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
महसूल मंत्री व नागपूर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत देताना कोणतेही निकष बाजूला ठेवले जातील आणि प्रत्येक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन आणि प्रत्यक्ष पंचनाम्याच्या माध्यमातून नुकसान मोजणी केली जात आहे.
बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुका, मौजा दाढेरा, तिडंगी, तेलगाव, नांदा गोमुख आणि इतर गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांना धीर दिला. संत्रा, सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला अशा विविध पिकांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणत्याही शेतकऱ्याला अन्याय होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक असल्यास दुरुस्ती केली जाईल.
राज्यात ऑगस्ट अखेरपर्यंत सुमारे 25 लाख हेक्टर आणि सप्टेंबर महिन्यात 22 लाख हेक्टर शेतजमिनीवर नुकसान झालेले आहे. येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण आकडेवारी मिळेल, त्यानंतर मंत्रीमंडळात विचारविनिमय करून शेतकऱ्यांसाठी निर्णय जाहीर केला जाईल.
बावनकुळे म्हणाले की, शहरांमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे पाणी साचत आहे. त्यामुळे जल निस्सारण आणि मल निस्सारण तसेच ग्रामीण भागात जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर देऊन मातीची धूप कमी करणे आणि पूराचा धोका कमी करणे आवश्यक आहे.