Published On : Sat, Mar 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

“मी राधे मंगलम हॉल चौक बोलतोय…”; दोन भीषण अपघातांनंतर मुख्यमंत्र्यांना नागरिकांचे खुले पत्र!

प्रतापनगर रिंग रोडवरील चौकाबाबत सिग्नल, स्पीड ब्रेकर आणि वाहतूक नियंत्रणाची तातडीची मागणी
Advertisement

नागपूर : नागपूरच्या प्रतापनगर रिंग रोड परिसरातील राधे मंगलम हॉल चौक गेल्या काही दिवसांपासून भीषण अपघातांमुळे चर्चेत आला आहे. अवघ्या एका महिन्यात येथे दोन गंभीर अपघात घडले असून त्यात एका तरुणासह एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत “मी राधे मंगलम हॉल चौक बोलतोय…” अशा शब्दांत एक भावनिक आणि कठोर खुले पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

या पत्रात चौकानेच जणू आपली व्यथा मांडल्यासारखी भाषा वापरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले आहेत. ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात एका रॅपिडो चालकाचा मृत्यू झाला, तर २१ फेब्रुवारी रोजी भरधाव वेगाने आलेल्या वाहनामुळे एका ज्येष्ठ महिलेचा जीव गेला. स्थानिकांच्या मते, पहिल्या अपघातानंतरच प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या असत्या तर दुसरा अपघात टाळता आला असता.

Gold Rate
Apr 30- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,49,400 /-
Gold 22 KT ₹ 1,38,900 /-
Silver/Kg ₹ 2,38,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागरिकांचे म्हणणे आहे की, या चौकात नियमितपणे छोटे-मोठे अपघात घडत असतात. सिग्नल नसणे, स्पीड ब्रेकरचा अभाव, वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, तसेच रस्त्याच्या कडेला होणारी अनियंत्रित पार्किंग यामुळे येथे सतत धोका निर्माण होत आहे. चौकाजवळील ‘खाऊ गल्ली’, पाईपलाईनचे काम, बांधकाम साहित्य आणि काही निरुपयोगी इलेक्ट्रिक पोल यांमुळेही वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

पहिल्या अपघातानंतर प्रतापनगर परिसरातील तरुणांनी येथे मुक आंदोलनही केले होते. मात्र, त्यानंतरही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. सध्या चौकात तात्पुरता पोर्टेबल सिग्नल बसवण्यात आला असला तरी अनेक वाहनचालक त्याचे पालन करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हेल्मेट न घालणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे आणि सिग्नल तोडणे अशा प्रकारांमुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे यांचे लक्ष वेधत या चौकातील वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. सिग्नल, स्पीड ब्रेकर, वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की,अपघात घडल्यावरच उपाययोजना का? लोकांनी निवेदन देण्याची वाट पाहण्यापेक्षा प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली पाहिजेत.

या घटनांमुळे प्रतापनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आणखी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement