नागपूर:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली.या लॉक डाऊन चा फटका हा भारतीय जीवन विमा प्रतिनिधी वरही पडला.नागपूर डिव्हिजन ला एल आय सी च्या २६ तर नागपूर शहरात १० शाखा आहेत.या शाखा अंतर्गत एकूण ६० हजार विमा प्रतिनिधी काम करून आपला उदरनिर्वाह करतात.विमा प्रतिनिधी चे कमिशन च्या माध्यमातून कमाई होत असते.जे त्यांना महिन्यातून एकदा मिळत असते.परंतु लॉक डाऊन असल्यामुळे ते आपल्या ग्राहकांकडून विमा प्रीमियम गोळा न करू शकल्यामुळे व कुठलीही नवीन व्यवसाय करू न शकल्यामुळे त्यांना मिळणारे कमिशन त्यांना मिळाले नाही त्यामुळे विमा प्रतिनिधींवर उपासमारीची पाळी आली असल्याचे अनेक प्रतिनिधींनी सांगितले.
भारतीय जीवन विमा ही भारतातील अग्रगण्य व सर्वात मोठी विश्वसनीय विमा कंपनी आहे.देशात एकूण एल आय सी चे १२ लाखाचे वर प्रतिनिधी कार्यरत आहे.त्यातही जवळपास १० लाख प्रतिनिधी हे ग्रामीण भागात काम करतात.त्यांचा पूर्ण परिवार हा एल आय सी च्या तुटपुंज्या परिश्रमीक कमिशन वरच चालतो.परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्ण देशभर पसरू नये म्हणून लॉक डाऊन करण्यात आल्याने देशाची पूर्ण गती जागीच थांबली.सर्व उद्योग,कारखाने व कार्यालये बंद पडली आहे.परंतु कारखान्यात व कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळन्याची शक्यता आहे.परंतु भारतीय जीवन विमा योजनेत काम करणारे देशातील १२ लाख विमा प्रतिनिधी व त्यांचा परिवाराची चिंता ना शासनाला आहे किंवा एल आय सी प्रबंधनाला नसल्याचे दिसून येते.
महत्वाची बाब अशी की,विमा व्यवसायात विमा प्रतिनिधी हे व्यवसायाचा कणा आहे.विमा प्रातिनिधिच हे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचून विमा विकत असतात.एल आय सी चा पूर्ण डोलारा हा विमा प्रतिनिधींवरच अवलंबून असतो.प्रतिनिधी मुळेच सर्व कर्मचारी व कार्यालयाचा खर्च चालत असतो.परंतु एल आय सी मधील इतका महत्वाचा दुवा या कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आज हतबल झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आपल्या पाच कलमी योजनेच्या मागणी करिता ऑल इंडिया लियाफी या संस्थेकडून एल आय सी व्यवस्थापनाला वारंवार पत्रव्यवहार करून विमा प्रतिनिधीला मागील वर्षी केलेल्या व्यवसायाच्या ५० टक्के बिनव्याजी रक्कम ३६ महिन्याच्या समान कीस्तवर देण्यात यावी.त्यातही पहीली किस्त ६ महिन्यांनी कापावी.त्याच प्रमाणे सरकारने प्रत्येक विमा प्रतिनिधीला ५ लाख रुपयांचा मेडिक्लेम करून द्यावा आदी मागण्या केल्या आहे.
विशेष बाब म्हणजे देशात निर्माण झालेल्या कोरोना नावाच्या वैश्विक महामारीवर मदत म्हणून एल आय सी ने प्रधानमंत्री रिलीफ फंड ला १०५ करोड रुपये देऊन मदत केली आहे.परंतु ज्यांच्या भरवश्यावर एल आय सी चा डोलारा उभा आहे ते मात्र मदतीपासून वंचित असल्याने विमा प्रतिनिधी चिंतीत असल्याचे सांगितले.